खेडी ते गोंडपिपरी रस्ता बनला मृत्यूचे दार… — संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची युवक काँग्रेसची मागणी… — खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून युवक काँग्रेसने केला निषेध..

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

                खेडी ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच वर्षापासून बांधकाम कासवगतीने सुरू आहे. शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च करून मंजूर करण्यात आलेला रस्ता अतिशय निकृष्ट असून बांधकाम करतानाच मोठे मोठे खड्डे पडत आहेत. कंत्राटदार, संबंधित अधिकारी व राजकीय नेत्यांनी यामध्ये मोठा नफा कमवून रस्त्याच्या दर्जाची ऐसी तैसी केलेली आहे.

          सदर रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे कित्येक प्रवाशांचे जीव या रस्त्याने घेतलेले आहेत तर कित्येकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले आहे. सदर रस्त्याच्या बांधकामासाठी युवक काँग्रेसने यापूर्वीही मोठे आंदोलन केले होते. तेव्हा कामाची गती वाढलेली होती परंतु पुन्हा कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने कामाचे स्वरूप कासवगतीने झाले असून दर्जाहीन काम होत आहे.

          बेंबाळ ते नांदगाव मार्गावर नुकत्याच बांधलेल्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मधोमध जेसीबीने खड्डे खोदून ठेवले असून यामुळे नुकताच एक मोठा अपघात झाला व पुन्हा जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. जर कंत्राटदाराच्या चुकीमुळे प्रवाशांचे जीव जात असेल तर याला जबाबदार कोण?

             याचा निषेध म्हणूनच युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन नीलमवार, काँग्रेसचे कार्यकर्ते मल्लेश मुद्रिकवार, मारोती गद्येकार, उमाकांत मडावी, सुकलाल शिंदे, शांताराम सातरे, समीर सातरे, जालिंदर वाळके राकेश कुंभारे, मनीष सातरे, छकुल वाळके तथा अन्य कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यावर बेशरमाचे झाड लावून कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

           वरील मागणी पूर्ण न केल्यास या विरोधात संपूर्ण रस्त्यावर चक्काजाम करून उग्र आंदोलन करण्यात येईल व आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार संबंधित कंत्राटदार व प्रशासन राहील असा गंभीर इशारा युवक काँग्रेसने दिलेला आहे.