शाहिरांनी राज्यकर्त्यांपासून सावध रहावे : संभाजी भिडे गुरुजी… — शाहीर हेमंतराजे मावळे रचित ‘गर्जली म-हाठी शाहिरी’ ग्रंथाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : देशभक्ती, धर्मभक्ती आणि समर्पण निर्माण करण्याकरिता शाहिरी महत्वाची आहे. केवळ स्तुतीसाठी शाहिरांनी आपली जीभ, वाणी व बुद्धी याचा वापर करु नये. मातृभूमी, देशभक्ती, स्वातंत्र्य भक्तीची उपासना म्हणून शाहिरांनी या क्षेत्रात उतरावे. मात्र, शाहिरांनी राज्यकर्त्यांपासून सावध रहावे, असा सल्ला शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे तर्फे आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे रचित शाहिरी रचनांचा ग्रंथ असलेल्या ‘गर्जली म-हाठी शाहिरी’ चे प्रकाशन टिंबर मार्केट येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झाले. यावेळी व्यासपीठावर आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर आदी उपस्थित होते. बुकमार्क पब्लिकेशन्स पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

संभाजी भिडे गुरुजी म्हणाले, शाहीर मंडळी राष्ट्राच्या जागरणाचे काम करणारी जात आहे. जगाला हाक मारुन अंत:करणापासून उठविणारी ही मंडळी आहेत. मराठयांचा इतिहास आपण वाचत नाही. देशाने याकडे पाठ फिरविली, तर आपण ताकद उत्पन्न करु शकणार नाही. ती ताकद उत्पन्न करण्याचे सामर्थ्य शाहिरांमध्ये आहे. देश आज बधीर होत चालला आहे. याकरिता जागृतीचा मार्ग शाहिरीतून काढण्यासोबतच शाहिरी परंपरा मोठी होण्याकडे लक्ष द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, स्वर्गीय शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ही शाहिरी शब्द सुमनांजली मी पुस्तकरुपाने अर्पण करीत आहेत. यामध्ये शाहिरीच्या २५ रचना दिल्या आहेत. गण, मुजरा, पाळणा आणि ऐतिहासिक पोवाडयांचा यामध्ये अंतर्भाव आहे. तसेच पुस्तकावरील बारकोडच्या माध्यमातून याच्या चाली देखील ऐकायला मिळणार आहेत. शाहिरी साहित्य समाजापुढे आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी यावेळी राजमाता जिजाऊ यांच्यावरील पोवाडा व महाराष्ट्र गीत सादर केले. शाहीर होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.संगीता मावळे यांनी आभार मानले.