‘लोकशाही हीच सत्याग्रहाची फलश्रुती’ :- डॉ.अशोक चौसाळकर… — महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’ च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन..

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

पुणे : अगदी लहान मुलाला सत्याग्रहातून आत्मबळ मिळाल्याने स्वातंत्र्य लढा व्यापक झाला आणि भारताला लोकशाही मिळाली, हीच सत्याग्रहाची फलश्रुती आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विश्लेषक डॉ.अशोक चौसाळकर यांनी केले.

           राष्ट्रपिता महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ विश्लेषक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांच्याहस्ते झाले. यावेळी चौसाळकर बोलत होते.

            महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार मराठीत यावेत यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर यांनी विशेष प्रयत्न केले.त्यातून ‘सत्याग्रह विचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. प्रथमावृत्तीचे प्रकाशन मामासाहेब देवगिरीकर यांच्याहस्ते झाले होते.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे द्वितीय अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.महात्मा गांधींच्या विचारांचे सार या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे एकूण २० खंड आहेत. त्यातील चौथ्या खंडाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, अरूण खोरे, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर आदी उपस्थित होते.

            डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले,’ महात्मा गांधी यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. सत्याग्रहाचे आचरण आणि त्याचा आशय अंगी बाणवला पाहिजे.सत्याग्रह ही मजबुरी नाही. तर अन्याय सहन न करता तीव्र आणि अहिंसात्मक प्रतिकार करणे हे सत्याग्रहाचे सार आहे. 

             डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’ परिवर्तनासाठी आपण रोज प्रयत्न केले तर सामान्य माणूस देखील महात्मा होतो, ही सत्याग्रह आणि सर्जनशिलतेची ताकद आहे. समाजवादी मंडळी गांधीवादी झाल्याशिवाय ते काल सुसंगत ठरणार नाहित. लोकशाहीची प्रतिनिधि शाही होवू नये असे वाटत असेल तर सत्याग्रह सामाजिक जीवनात असला पाहिजे. वैयक्तिक जीवनात देखिल सत्याग्रह हे महत्वाचे मूल्य आहे’.