येवदा वासियांना करावा लागतो पाणी टंचाईचा सामना, चार दिवसा आड पाणी पुरवठा…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

   दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले व २५ हजार लोकसंख्या असलेल्या येवद्याला चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, पाण्यावाचून नागरिकांसह पाळीव प्राण्यांचे हाल होत आहेत, नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

        म. जि. प्रा. च्या नियोजन शून्य कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत आहे.येवदा हे गाव खारपान पट्ट्यात येत असल्याने जमिनीतील पाणी पिण्यायोग्य नसल्याने शहानुर धरणातून होत असलेल्या पाणीपुरवठ्यावर येथील नागरिक अवलंबून आहेत. 

          उन्हाळा सुरू होताच मागिल दोन वर्षांपासून दोन दिवसाआड असणारा पाणी पुरवठा तीन ते चार दिवसा आड करण्यात आला.परंतु हा निर्णय अंजनगाव – दर्यापूर तालुक्यात केवळ येवदयालाच लागू करून इतर ठिकाणी मात्र एक दिवसा आड पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या शहानुर धरणात मुबलक पाणी साठा आहे. तरी सुद्धा येवदा वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामिण भागातील जनतेकडे साठवण क्षमता कमी असल्याने ते पाणी साठवू शकत नाहीत.

            तसेच शेती व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांकडे गुरे ढोरांना सुद्धा आपली तहान भागविण्या करीता पाण्याची आवश्यकता आहे,एवढे पाणी साठवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

     आरोग्यास हानिकारक असलेले क्षारयुक्त बोअर चे पाणी पिण्यास येथील नागरिकांना भाग पाडले जात आहे. त्यामुळे साथीचे तसेच किडनीचे आजार बळावन्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

   मुबलक जलसाठा उपलब्ध असतांना सुदधा पाणी टंचाई कशी राहू शकते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे . या बाबत मागील वर्षी अनेक आंदोलन सुद्धा झाले, प्रहारतर्फे झालेल्या आंदोलनात कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे लेखी पत्र देऊन वेळ मारून नेली व कुठलाच बदल न करता अनियमित पाणी पुरवठा सुरुच ठेवला.    

        येवदयाला महीन्यातून केवळ ७ ते८ दिवस पाणीपुरवठा होत असून नळाचे बिल मात्र महिन्याचे येत आहे , त्यामुळे जनतेच्या पैशांची सुद्धा लूट करण्यात येत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत त्यामुळे नळ बिलांची वसुली सुदधा फारशी होतांना दिसत नाही. या बिलांची वसुली न होण्याकरिता म जि प्रा च जबाबदार राहील अशी चर्च्या नागरिक करीत आहेत .वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

       याबाबाबत प्राधिकरणाच्या दर्यापूर कार्यालयाला कितीही फोन केले तरीही तेथील अभियंता फोन उचलतच नाहीत. त्यामुळे येवदयाचा पाणीपुरवठा चार दिवसा आड कुणाच्या आदेशाने करण्यात आला याची चौकशी करून जनतेला वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई प्राधिकरणाने करावी व पाणीपुरवठा नियमित करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

        कार्यकारी अभियंता अमरावती नितीन उपरेलु यांना या बाबत विचारणा केली असता त्यांनी येवद्यातील नागरिक खोटे बोलतात येवदा येथे एक दिवसाआड पाणीपुरवठा सूर आहे असा आरोपच येथील नागरिकांवर केल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे . उपरेलू यांनी कुठलीच शहानिशा न करता असा आरोप केल्याने आधीच पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या अभियंत्याने केल्याने येथील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणाने त्या विषयीचे पत्र ग्रामपंचयातला दिले असून याची सुद्धा या अभियंत्याला माहीती नाही अभियंता व प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्रा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

प्रतिक्रिया 

  चार ते पाच दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना क्षारयुक्त विहीर व बोअरचे पाणी प्यावे लागत असल्याने डायरिया ,टॉयफाईड , व किडनीच्या रोग्यांमद्धे वाढ होत आहे , प्राधिकरण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे, ताबडतोब पाणीपुरवठा एक दिवसाआड होणे गरजेचे आहे. 

डॉ रविंद्र मानकर, पाणी पुरवठा समिती सदस्य

     मागिल दोन वर्षांपासून येथील पाण्याची समस्या सोडविण्या करिता अनेकवेळा पत्रव्यवहार व आंदोलन केली ,लेखी आश्वासन देऊन सुद्धा प्राधिकरणाच्या मग्रूर अधिकाऱ्यांनी शब्द फिरविला व आंदोलकांची फसवणूक केली , त्यामुळे पाणीपुरवठा एक दिवसाआड जर करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन प्रहार व नागरिकांच्या वतीने करण्यात येईल.

प्रदीप वडतकर,जिल्हा संघटक, प्रहार जनशक्ती पक्ष