पाणीपुरवठ्याची कामे मूदतीत पूर्ण न करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करणार :- जिल्हाधिकारी…  — जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न..

ऋषी सहारे

   संपादक

गडचिरोली, : पाणीपुरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या व निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय देने यांनी दिले.

         यासोबतच कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास कंत्राटदारांसोबतच संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत गंभीर दखल घेण्याच्या सूचना श्री देने यांनी दिल्या.

        जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक काल जिल्हाधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

        जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील, वरिष्ट भूवैज्ञानिक अभिजीत धाराशीवकर उपस्थित होते.

           नागरिकांना तातडीने पाणी मिळावे यासाठी कोणत्याही परिस्थितीत योजनेच्या कामांना उशीर होवू नये. ग्रामीण व दुर्गम भागात पावसाळ्यातही कामे बंद पडू नये याची दक्षता घेवून रेती, गिट्टी, सिमेंट आदी साहित्यसाठा आताच उपलब्ध करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवावे व संबधीत विहिरीवर उंच कठडे व जाळी लावून ते सुरक्षीत केली असल्याची खात्री करून घेण्याचे त्यांनी सांगितले.

         कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण १०८२ मंजूर पाणीपुरवठा योजनांपैकी ९२९ पूर्ण तर १५३ प्रगतीपथावर आहेत. तसेच आदीम जमातीसाठीच्या पीएमजनमन योजनेतील १२६ पैकी ४४ पूर्ण तर ८२ योजना प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

         बैठकीला जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे संबंधीत अधिकारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.