नंदलाल पाटील कापगते विद्यालयातील विद्यार्थ्यांची नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे वनभ्रमंती…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली या विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना इको क्लबच्या विद्यार्थ्यांची नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे वनभ्रमंतीचे आयोजन नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प तर्फे करण्यात आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री भुते साहेब यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात वनभ्रमंती निसर्ग शिबिराचे आयोजन संपन्न झाले. 

          यावेळी नागझिरा येथे वनभ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांनी अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरिने गवतामध्ये शांतपणे चरताना दिसले तसेच वाघ,बिबट, जंगली डुक्कर, मोर, रानगवे इत्यादी अनेक प्राणी व पक्षी बघायला मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे असंख्य वृक्ष साग, बांबू, आवळा, धावडा,ऐन इत्यादी वृक्षांची ओळख व माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. नागझिरा तलाव अतिशय प्रसिद्ध तितकाच मनमोहक निसर्गरम्य असल्याने त्या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी व फुलपाखरे यांची संख्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. 

             या अभयारण्यातील रस्ते पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपाची असून येथे हार्न वाजवणे, गाडी बाहेर उतरणे प्रतिबंधक करण्यात आलेली असून मोठ्या प्रमाणात शिस्त दिसून आले.

            यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री भुते साहेब यांनी जंगल आणि पाणी यांचे सहसंबंध,जंगल तोडीमुळे होणारे पर्यावरणातील बदल, जंगलातील व्यवस्थापन, जंगलातील फळ, रानभाज्या या सर्व विषयांवर चर्चेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे निसर्गप्रेमी पुरंदरे साहेब यांनी सुद्धा विविध पक्षी – प्राणी यांचे उपयोग आवाज काढत त्यांचे महत्त्व, जीवन जगण्याची पद्धत, खानपान यावर सुंदर असे मार्गदर्शन केले.

           नागझिरा अभयारण्य भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना समृद्धी वनसृष्टी व जैवविविधतेचे दर्शन घडले याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. 

             यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापिका रसिका बी. कापगते, राष्ट्रीय हरित सेना शिक्षक आर. व्ही. दिघोरे, डी.डी.तुमसरे ,डी.आर. देशमुख ,के.एम.कापगते इत्यादी प्रामुख्याने वनभ्रमंती मध्ये सहभागी झाले होते.