फेसबुक वाले नव्हे, तर लोकांच्या “फेस” वर स्माईल आणणारे राज्याचे सरकार : चित्रा वाघ — चित्र वाघ यांच्याकडून खासदारांचे तोंडभरून कौतुक…

 प्रितम जनबंधु

     संपादक 

         भंडारा:- देश आज प्रगतीच्या दिशेने गतिशीलतेने अग्रेसर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाच्या बळावर हे शक्य होत असतानाच महाराष्ट्रातही गतिमान झाला आहे. महाराष्ट्रातील फेसबुक वर चालणारे सरकार जाऊन, लोकांच्या “फेस” वर स्माईल आणणारे सरकार आज तुमच्या सेवेत आहे. सदैव कार्यक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपणारे खासदार या मतदारसंघाला मिळालेली देणगी आहे. ती कायम जपा आणि खासदारांसह भाजपच्या पाठीशी आपला खंबीर पाठींबा असाच ताकदीने कायम ठेवा असे आवाहन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज साकोलीत केले.

            खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपस्थिती लावून उपस्थित हजारो महिलांना आणि प्रेक्षकांना त्यांनी संबोधित केले.

              मागील महिनाभर संपूर्ण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून साकारलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने घेतला जात होता. या अंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर महिला, युवक, युवती त्यांच्यासाठी समूह नृत्य आणि पारंपारिक नृत्याच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. तालुकास्तरावर विजेत्या ठरलेल्या संघांना लोकसभा स्तरावर स्वतःच्या कलागुणांना वाट मोकळी करून देण्यासाठी लोकसभा स्तरीय स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. 7 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर आज चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला. 

            यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, शुभांगीताई मेंढे, अलकाताई आत्राम, रचना गहाणे, कल्याणीताई भुरे, वैशाली चोपडे, शालिनी डोंगरे, मोहन सुरकर, माहेश्वरी नेवारे, वनिता डोये तुमेश्वरी बघिले, सीताताई रहांगडाले, सोनालीताई देशपांडे, धनवंत राऊत, निशा तोडासे, पूजा तिवारी, साधना त्रिवेदी, चंद्रकला भोपे, आदिता काळबांधे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

            दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी स्वर्गीय बाबुराव मेंढे स्मृती प्रतिष्ठान च्या शुभांगी मेंढे यांनी प्रास्ताविकातून सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करीत ग्रामीण भागातील कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आनंद असल्याचे म्हणाल्या. 

          देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील युवकांमधील सामर्थ्य ओळखून त्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक महोत्सव एक प्रयोग होता. ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांपासून तरुण-तरुणी पर्यंत सर्वांनीच या महोत्सवाला उदंड प्रतिसाद देत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातही कलाकारांची वानवा नाही हे दाखवून दिले. ग्रामीण भागातील ही कला देश पातळीवर उजागर होण्याच्या दृष्टीने शक्य ते प्रयत्न करू, असा शब्द यावेळी खा. सुनील मेंढे यांनी दिला.

            हजारोच्या संख्येतील उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना चित्रा वाघ यांनी, आज देशातील प्रत्येक मातेची हाक ऐकण्याचे सामर्थ्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले.  

               देशातील स्त्री आणि मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना भविष्यात क्षमा केली जाणार नाही या दृष्टीने कायदा लवकरच येणार असल्याचे सांगून हे सरकार महिलांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कायम पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या.

        भंडारा-गोंदिया जिल्ह्यात प्रचंड प्रतिभावंत कलाकार दडले आहेत. अशा आयोजनातून त्यांना योग्य दिशा मिळाल्यास भविष्यात ते देश पातळीवर स्वतःला सिद्ध करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

         ज्या लोकसभा मतदारसंघात खासदार लोकांप्रती आणि त्यांच्या कल्याणाप्रती एवढा सकारात्मक असेल, मतदारांसाठी ही जमेची बाजू असते. लोकांचे दुःख ऐकून घेत त्यांच्या पाठीशी खंबीर राहणारा खासदार म्हणून कोरोना काळात सुनील मेंढे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

          युवा पिढीसाठी आज सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून नवे दालन त्यांनी उघडून दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सकारात्मक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होत असताना खासदारांचा हा प्रयत्न त्याला साजेसा असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

          महाराष्ट्रातही गतिशील आणि संवेदनशील सरकार आहे. फेसबुक वर चालणारे सरकार जाऊन लोकांच्या फेस वर स्माईल आणणारे सरकार आल्याने कुणालाही चिंता करण्याची गरज नाही असेही त्या म्हणाल्या.

         कार्यक्रमादरम्यान चित्रा वाघ यांनी ग्रामीण भागातील कलाकारांच्या नृत्याचा आविष्कार तल्लीनतेने बघितला. यावेळी त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. महोत्सवा दरम्यान महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्यांची चित्रा वाघ यांच्या हस्ते आयोजकांकडून कौतुक करण्यात आले.