Home Social डॉ.रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार २०२६’ जाहीर; नामदास महाराज व चंदाताई तिवाडी यांचा...

डॉ.रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार २०२६’ जाहीर; नामदास महाराज व चंदाताई तिवाडी यांचा सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक 

पुणे : संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार २०२६’ची घोषणा करण्यात आली आहे. यंदा कीर्तनसेवा पुरस्कार संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज हभप केशव महाराज नामदास यांना, तर लोककला सेवा पुरस्कार पंढरपूर येथील भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.भावार्थ देखणे यांनी दिली.

         यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाच वाजता प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे असणार आहेत. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

         यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वै. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या साहित्य, लोककला आणि वारकरी संप्रदायातील मोलाच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षापासून कीर्तन आणि लोककलेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.