शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस,गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या पीक विमा योजनेअंतर्गत तात्काळ आर्थिक मदत मिळावी,अशी मागणी शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
चिमूर तालुक्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले असून,शेती हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. परंतु झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली असून,आता पीक पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर कर्जफेडीचा ताण वाढला आहे.
पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले होते व आता पीक विमा योजने अंतर्गत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे.
तसेच,हेक्टरी प्रमाणे विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून प्रीमियमच्या स्वरूपात पैसे घेतले असताना,नुकसान भरपाई देण्यात झालेला विलंब गंभीर बाब असून,याबाबत संबंधित विमा कंपन्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करून रक्कम खात्यात जमा करावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.
या परिस्थितीत शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देणे अत्यंत आवश्यक आहे.तसेच विमा कंपन्यांनीही विलंब न करता शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की,शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्वरित मदत जाहीर करावी,हीच सर्व शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.



