शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) प्रशासनातर्फे दिनांक 1 मे 2026 रोजी,बुद्ध पोर्णिमा निमित्त “निसर्ग अनुभव – 2026” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमामध्ये निसर्गप्रेमींना व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पाणवठ्यावरील मचानवरून रात्रभर वन्यजीव निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी mytadoba.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर 21 एप्रिल 2026 (सकाळी 11:00 वाजता) ते 22 एप्रिल 2026 (सायं. 5:00 वाजेपर्यंत) उपलब्ध राहील. अर्जदारांचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. एकूण 57 मचान उपलब्ध असून प्रत्येक मचानवर कमाल 2 सहभागी राहू शकतात.निवड प्रक्रिया प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First-Come, First-Served) या तत्त्वावर करण्यात येईल व यशस्वी ऑनलाइन नोंदणी व शुल्क भरल्यानंतर नोंदणी निश्चित करण्यात येईल. क्षेत्र संचालक, ताडोबा यांचा निर्णय अंतिम राहील.
मागील वर्षी प्रति मचान एकूण शुल्क ₹.४,५०० प्रत्यक्ष भरावे लागत होते.यावर्षी शुल्कात कपात करून अधिक सहभाग प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी सहभाग शुल्क प्रति मचान ₹.३,५०० (कमाल २ व्यक्तींसाठी) निश्चित करण्यात आले आहे.यामध्ये ₹.५०० ऑनलाइन नोंदणी शुल्क (न परतविण्यायोग्य) व ₹.३,००० (₹.१,००० मार्गदर्शक + ₹.२,००० जिप्सी शुल्क) सफारी गेटवर भरावे लागतील.मचान बुकिंग झाल्यानंतर रद्द करण्याची कोणतीही तरतूद राहणार नाही.तसेच,बुकिंग झालेल्या प्रवेशव्दार परवान्यातील व्यक्तींच्या नावामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
सहभागींनी दिनांक 1 मे 2026 रोजी सायं. 4:00 वाजेपर्यंत त्यांना नेमून दिलेल्या सफारी गेटवर हजर राहणे आवश्यक आहे.कार्यक्रमाची समाप्ती 2 मे 2026 रोजी सकाळी 6:00 वाजता होईल.
वाहतूक व्यवस्था केवळ ताडोबा अधिकृत वाहनांद्वारे करण्यात येईल.खाजगी वाहनांना परवानगी दिली जाणार नाही.
हा उपक्रम वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती व जबाबदार पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असून नैसर्गिक अधिवासात वन्यजीवांचे निरीक्षण करण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून देतो.
“निसर्ग अनुभव – २०२६” बाबतची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे असे डॉ प्रभू नाथ शुक्ल,भा.व.से.वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर यांनी प्रशिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे.



