शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
राष्ट्रीय उद्यान ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील सातारा गावाने आधुनिक शेतीकडे वाटचाल करत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
प्रगतिशील शेतकरी विनोद बिरजे यांनी १७ एकर करडई पिकावर ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केला.
ड्रोन फवारणीमुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अत्यल्प वेळात काम पूर्ण झाले.या प्रक्रियेत सुमारे ३० टक्के रासायनिक औषधांची बचत झाली,तर तब्बल ९० टक्के पाण्याची बचत झाल्याचे बिरजे यांनी सांगितले.
परिणामी उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होऊन पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार आहे.या उपक्रमामुळे गावातील इतर शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत उत्साह निर्माण झाला असून भविष्यात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आदर्श व स्मार्ट गाव सातारा येथील सरपंच गजानन गुडधे यांनी या प्रयोगाचे कौतुक करत,“हा उपक्रम सातारा गावासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची सुरुवात असून गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल,” असे मत व्यक्त केले.
तसेच ‘सलाम किसान’ च्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आभार मानले.या प्रसंगी आदर्श गाव सातारा येथील व्हिजिटर कॅम्पमधील पाहुण्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले.
कार्यक्रमाला सहाय्यक कृषी अधिकारी बळीराम येवले,मंडळ कृषी अधिकारी आर.बी.सोनवणे,‘सलाम किसान’चे प्रबंधक सुमित मुंगले तसेच ड्रोन पायलट मुकेश नागदेवते उपस्थित होते.
सातारा गावातील हा प्रयोग ग्रामीण भागात तंत्रज्ञानाधारित,जलसंधारणाभिमुख आणि आधुनिक शेतीचा नवा मार्ग दाखवणारा ठरत असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे शेती अधिक कार्यक्षम,किफायतशीर आणि शाश्वत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



