लक्षवेधी
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली तालुक्यातील बोरमाळा नदी घाट परिसरात पाण्याअभावी चार हेक्टरवरील केळीची बाग करपण्याच्या स्थितीत आली असून दोन युवा शेतकऱ्यांचे लाखोंचे स्वप्न धुळीस मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. उद्योगविरहित मानल्या जाणाऱ्या सावली तालुक्यात विहीरगाव येथील समीर घरत आणि विकास पुरेल्लीवार या दोन प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने व धाडसाने आधुनिक पद्धतीने केळी लागवडीचा प्रयोग हाती घेतला होता. त्यांच्या या प्रयोगातून सुमारे चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आता पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे संपूर्ण बाग धोक्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीकाठच्या सुपीक जमिनीवर त्यांनी चार हेक्टर जमीन भाड्याने घेऊन केळीची लागवड केली होती. सुरुवातीपासूनच बाग उत्तम वाढत गेली. योग्य नियोजन, मेहनत आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करून उभारलेली ही बाग परिसरात चर्चेचा विषय ठरली होती. केळीच्या झाडांना घडधारणा सुरू झाल्यानंतर पाण्याची सर्वाधिक गरज असतानाच वैनगंगा नदीचे पात्र अचानक कोरडे पडू लागले. त्यामुळे मोटार पंपाद्वारे पाणी उपसा करणे अशक्य बनले असून संपूर्ण बाग कोमेजण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वी बोरमाळा घाट परिसरातील नदीपात्रात वर्षभर पुरेसे पाणी राहत असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता मोठे साहस केले होते. परंतु यंदा वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. केळीसारख्या नगदी पिकाला सतत पाण्याची आवश्यकता असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने झाडांची वाढ खुंटली असून अनेक झाडे करपू लागली आहेत.
या बागेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जमीन भाडे, ठिबक सिंचन, खते, औषधे, मजुरी आणि वीज खर्च यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक ओझे आले आहे. आता पिकच वाचण्याची शक्यता कमी झाल्याने दोन्ही युवा शेतकरी मानसिक तणावात आहेत. शेतीत काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रयोग केला होता. मात्र नैसर्गिक परिस्थितीमुळे त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पर्यायी पाणीपुरवठा, टँकर सुविधा किंवा नदीपात्रातील पाणी साठवणुकीसाठी उपाययोजना केल्यास बाग वाचू शकते, असेi मत व्यक्त केले जात आहे. अन्यथा लाखोंची गुंतवणूक वाया जाण्याबरोबरच युवा शेतकऱ्यांचा शेतीवरील विश्वासही डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी सदर भागात गेले असता शेतकऱ्यानी गाडीला हात दाखविले असता गाडी थांबवली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सदर विषयाच्या बाबतीत चर्चा करता आली नाही त्यामुळे उद्या ग्रामीण पत्रकार संघांचे अध्यक्ष मुन्ना(अनिल )स्वामी तथा पत्रकार संघांचे सदस्य व शेतकरी तहसील कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करणार असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे.



