राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा यांच्या वतीने कुरखेडा येथे ६ मे रोजी तहसील कार्यालय पुरवठा विभागाचे शासकीय गोदाम येथे मका खरेदी केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोपाल उईके आणि अविमचे संचालक यशवंत चौरीकर यांच्या हस्ते तर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कुरखेडा अध्यक्ष बाबुरावजी तुलावी, अविका संस्थेचे उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद खुणे, मोनेश मेश्राम, विनोद नागपूरकर कुरखेडा आवीकाचे संचालक पुंडलिकराव निपाने , अंतराम गावळे काशिनाथ पुडो अविका आंधळीचे व्यवस्थापक हेमंत शेंद्रे , हिराजी माकडे आविका कुरखेडा व्यवस्थापक लीलाराम घोसेकर , गेवर्धा केंद्रप्रमुख रामदास मस्के कुरखेडा केंद्रप्रमुख कपिल तुलावी आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी डी. जी मरसकोल्हे, तहसील कार्यालयाचे गोदाम व्यवस्थापक भाऊदास टेंभुर्णे परिचंद साखरे यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यानी आदिवासी विकास महामंडळ चे अधिकारी यांचे सह त्यांचे जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत शासन स्तरावर कार्यवाही करुन मका केंद्र त्वरीत सुरु करण्या बाबत व जास्तीतजास्त केंद्र सुरु करण्याबाबतचे निर्देश दिले होते. सुरू करण्यात आलेले हे केंद्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असून, त्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.
मका खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे स्थानिक शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.



