दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांना केंद्रस्थानी ठेवून पुण्यातील मुक्कामाबाबत अंतिम निर्णय प्रशासनाच्या लेखी अहवालानंतरच घेतला जाणार आहे. यासाठी १३ मे रोजी आळंदीत दिंडी समाज, फडकरी व मानकरी यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ऍड.राजेंद्र उमाप व विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी दिली.
पालखी विठोबा मंदिर परिसरात आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने आदींसह संयुक्त पाहणी झाली. यावेळी पुणे महापालिकेकडून ३१ मेपर्यंत मंदिर परिसरातील इमारती ताब्यात घेऊन आवश्यक सुविधा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले.
माऊलींची पालखी ८ जुलैला आळंदीतून प्रस्थान करणार असून ९ व १० जुलैला पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्काम अपेक्षित आहे. मात्र तेथील अपुरी जागा आणि सुविधांबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली.
महिला वारकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांवर स्वच्छतागृहे, तसेच सुमारे २० जर्मन हँगर मंडप उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, समाधानकारक व्यवस्था न झाल्यास बाबुराव सणस मैदान हा पर्यायही विचाराधीन असल्याचे देवस्थानने स्पष्ट केले.
११ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आणखी एक आढावा बैठक होणार असून, त्यानंतरच अंतिम वेळापत्रक जाहीर होणार आहे.



