भोर उपविभागात ‘शासन आपल्या दारी ‘योजनेअंतर्गत ३७ हजार १७ सेवांचे वाटप : प्रांताधिकारी राजेंद्र कचरे 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

भोर : शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत भोर उपविभागात भोर आणि वेल्हे तालुक्यात (दि.30)संपन्न झालेल्या महशिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून राज्य व केंद्र शासनाचे विविध विभाग मिळून एकूण ३७ हजार १७ सेवांचे वाटप केल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

      भोर तालुक्यासाठी शहरातील गंगोत्री हॉल येथे भोर,भोलावडे, संगमनेर,आंबवडेसह निगुडघर मंडलातील गावांतील तर नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स येथे वेळू ,नसरापूरसह किकवी मंडलातील गावातील नागरिकांसाठी स्वतंत्र एकत्रित शिबिर पार पडले असून एकूण 28 हजार 442 सेवा देण्यात आल्या आहेत.

       वेल्हे तालुक्याचे शिबिर दोन टप्प्यात घेण्यात आले असून यामध्ये पानशेत मंडलात एकूण 2605 सेवा व उर्वरित वेल्हे,विंझरसह अंबवणे महसूल मंडळात एकूण 5970 सेवा अशा एकूण 8575 सेवा निर्गमित करण्यात आल्या आहेत.

       शासन आपल्या दारी शिबिर कालावधीमध्ये भोर तालुक्यात 28 हजार 442 तर वेल्हे तालुक्यात 8575 अश्या भोर उपविभागात एकूण 37 हजार 17 सेवांचे वाटप करण्यात आले आहे.उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र ,शिधा पत्रिकेत नाव वाढविणे, कमी करणे ,नवीन मतदार नोंदणी, आधारकार्ड काढणे, यांसह राज्य शासनाच्या महावितरण,पंचायत समिती,कृषी,वन, पशुसंवर्धन,राज्य परिवहन,आरोग्य,भूमी अभिलेख,पाटबंधारे इ.विभागाचे विभागवार स्टॉलवर लावलेल्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.तर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या नागरिकांना तत्काळ विविध प्रमाणपत्रांचे वाटप प्रांत राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांचे हस्ते करण्यात आले.एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या योजनांची माहिती आणि पूर्तता होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

     भोरसह वेल्हे तालुक्यात नागरिकांनी अभियानाला उतम प्रतिसाद दिला आहे.उच्च शिक्षण घेवू इच्छिणारे विद्यार्थी ,जेष्ठ नागरिक यांना शिबिराचा चांगला उपयोग झाला असून नागरिकांचा वेळ आणि पैसे वाचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.भोरसह वेल्ह्यात वरील ठिकाणी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( सारथी ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ( बार्टी) यांची एकूण 4700 इतक्या संदर्भ साहित्याची(पुस्तकांची) विक्री झाली आहे.