गरंडा शाळेतील चिमुकल्यांनी केली पक्ष्यांसाठी दाण्यापाण्याची व्यवस्था.. — एक घास अन्नाचा,एक घास पाण्याचा..

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी:- एक घास चिऊचा,एक घास काऊचा असे म्हणत म्हणत आईने भरविलेला घास खात खात मुले मोठी झाली. शाळेत येऊ लागली.शाळेतही प्राण्या पक्ष्यांच्या गोष्टी मुले ऐकू लागली.सोबतच वृक्षतोडी मुळे निसर्गावर आणि प्राणी पक्ष्यांच्या जीवन चक्रावर होणाऱ्या परिणामांची जाणीव शाळेत होऊ लागली.

       उन्हाळा सुरू झाला पक्ष्यांना पाण्याची कमतरता जाणवू लागली.म्हणून पक्ष्यांसाठी अन्नापाण्याची शालेय परिसरात सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय केली.

      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा ही एक प्रयोगशील शाळा असून जैवविविधताच्या दृष्टिकोनातून येथील परिसर हिरवागार असून अनेक पक्ष्यांचा अधिवास या परिसरात पाहायला मिळतो. 

        पक्ष्यांच्या विणीच्या हंगामात पक्षी या परिसरात आपली घरटे तयार करीत असतात.या पक्ष्यांच्या दाण्यापाण्याची सोय शालेय परिसरातच व्हावी म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात सोय केली जाते.

        यावर्षी सुद्धा मुख्याध्यापक खुशाल कापसे यांचे संकल्पनेतून आणि सहाय्यक शिक्षक ओंकार पाटील यांचे मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचा दाणापाणी हा उपक्रम सुरू केला.

        या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात एक विशेष प्रकारचे स्टँड तयार करण्यात आले असून दोन मातीचे भांडे ठेवण्यात आले. यामध्ये पाणी आणि अन्न रोज पक्ष्यांसाठी ठेवण्यात येते.

       त्यामुळे शालेय परिसरातच निवारा आणि अन्न पाण्याची सोय झाली असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी सुद्धा सावलीत पक्ष्यांसाठी दाण्यापाण्याची सोय करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

        हा छोटासा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरेल यात शंकाच नाही.