Home देशविदेश राजकारण : तत्त्वाचे की सत्तेचे?….

राजकारण : तत्त्वाचे की सत्तेचे?….

          राजकारण म्हटले की केवळ निवडणूक आणि सत्ता या दोनच गोष्टी आपल्यासमोर असतात,परंतु त्या मागचे तत्व हे आपण लक्षात घेत नाही,म्हणूनच अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. 

      ‘ सत्तेसाठी काहीपण ‘ मकरंद अनासपुरे याचा चित्रपट पाहिला,त्यात उमेदवार आणि त्याचा पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबाची सुद्धा कशी वाताहत करतात,सत्य,न्याय,नीतीला कसे धाब्यावर बसवतात? त्याचे चित्र केलेले आहे. 

         उमेदवार असो की पक्ष असो,की पक्षाचे कार्यकर्ते असोत, ‘ सत्ता ‘ हे साध्य नसून साधन आहे,याची जाणीव किंवा हा विचार जेव्हा माणसाकडे नसतो,तेव्हा बरीचशी गडबड होते.

        खरे तर सत्ता आहे परिवर्तनाचे आणि विकासाचे साधन आहे,परिवर्तन आणि विकास हे साध्य आहे,ही स्पष्टता जेव्हा प्रत्येक उमेदवाराला त्याच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला आणि मतदाराला होईल तेव्हाच तत्त्वाचे राजकारण सुरू होईल.

        मला माझ्या मतदारसंघात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करायची आहे,चोऱ्या मारामाऱ्या भांडणे थांबवायची आहे,माझ्या मतदारसंघातील नागरी सुविधा जनतेला पुरवायचे आहेत,भौतिक विकास घडवून आणायचा आहे.

         देशाच्या दृष्टीने महाग आहे बेकारी,भ्रष्टाचार हा दूर करायचा आहे,देशातील नागरिकाचे सिद्धांतिक परिवर्तन आणि देशाची भौतिक विकास,हा दृष्टिकोन घेऊन उमेदवाराने सत्तेत जाणे म्हणजे तत्त्वाचे राजकारण होय.

        परंतु केवळ देशाचे आणि देशातील जनतेची माझे काही देणे घेणे नाही,केवळ मला माझा विकास करायचा आहे,मला भरपूर संपत्ती जमवायची आहे आणि तिचे संरक्षण करायचे आहे,यासाठी मला सत्ता हवी आहे,यासाठी म्हणून मी राजकारण करतो,या तत्त्वाचे राजकारण असे न म्हणता केवळ व्यवहाराचे राजकारण असे म्हटले पाहिजे.

        व्यवहारिक राजकारण हे एखाद्या कुटुंबाचा विकास घडवून आणू शकते,एखाद्या परिवारात ची सत्ता संपत्ती कायम टिकू शकते,परंतु मतदार संघ आणि देश याचा विकास किंवा जनतेत परिवर्तन घडवून आणू शकत नाही. 

         तत्त्वाचे राजकारण म्हणजे पुरोगामी राजकारण होय,आणि तत्व सोडून केलेले राजकारण म्हणजे व्यवहारिक राजकारण हे प्रत्येकाने राजकारण होईल,परिवर्तनासाठी आणि विकासासाठी केलेले राजकारण म्हणजेच तत्त्वाचे राजकारण होय.

       उमेदवाराला म्हणजे लोकप्रतिनिधीला तसेच त्यास मतदान करणाऱ्या नागरिकाला तत्त्व म्हणजे काय हेच माहिती नाही,तत्त्वनिष्ठा,पक्षनिष्ठा,देशनिष्ठा,सत्य न्याय नीती या गोष्टीचा अभ्यास नाही,असे मतदार आणि त्यांचे उमेदवार तत्त्वाचे राजकारण कसे करतील बरे? 

          भारतीय संविधानाला तत्त्वाचे राजकारण अपेक्षित आहे,सत्ता कशी स्थापन करावी आणि राज्यकारभार कसा चालवावा ? केवळ एवढेच सांगणारे हे पुस्तक म्हणजे संविधान नाही,केवळ कायद्याचे पुस्तक म्हणजे संविधान नव्हे,तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात कोणत्या प्रकारची व्यवस्था असावी? आणि ती व्यवस्था कोणत्या तत्त्वावर चालावी किंवा असावी? याचे विश्लेषण पण भारतीय संविधानात केलेले आहे.

        भारतातील प्रत्येक माणूस हा गुलाम म्हणून न राहता तो मालक म्हणून असला पाहिजे त्याचे सार्वभौमत्व,त्याचे मानवी अधिकार आणि हक्क अबाधित राहिले पाहिजेत,तसेच भारत देश सुद्धा कुणाचा गुलाम न राहता देशाचे सार्वभौमत्व आभारी राहिले पाहिजे,त्याची काळजी संविधानाने केलेली आहे. 

       भारत हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे,आर्थिक दृष्ट्या भारताने समाजवादी धोरण ठेवले पाहिजे,धार्मिक दृष्ट्या भारत हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे,राजकीय दृष्ट्या भारत हा लोकशाहीवादी देश असला पाहिजे,आणि सामाजिक दृष्ट्या भारत हा समतेचा समानतेचा देश असला पाहिजे,म्हणजेच सार्वभौमत्व,सत्तेची धर्मनिरपेक्षता आणि जनतेसाठी धर्माचे स्वातंत्र्य आणि सर्वधर्मसमभाव,समाजवाद,लोकशाही असलेला भारत म्हणजे भारताची ही व्यवस्था निर्माण करणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. 

        भारतीय संविधानाला अशा प्रकारची व्यवस्था तर अभिप्रेत आहेच,परंतु या व्यवस्थेला म्हणजे या व्यवहाराला,परिस्थितीला,अवस्थेला एक नैतिक अधिष्ठान सुद्धा देण्यात आलेले आहे,तात्विक अधिष्ठान देण्यात आलेले आहे,ते म्हणजे स्वातंत्र्य,समता,बंधुभाव आणि न्याय,या चार तत्त्वावर भारतीय व्यवस्था टिकून असली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे,अशी अपेक्षा संविधानाची आहे.

        तत्त्वावर आधारित व्यवस्था ती कशी? याची तरतूद आणि विश्लेषण पण संविधानाने केलेले आहे, 

       संविधानाला लोकशाहीवादी सत्ता अपेक्षित आहे,लोकांच्या इच्छा आकांक्षा आणि लोकांची मागणी लक्षात घेऊन,निवडणुकी ईव्हीएम मशीनद्वारे घ्यावी की बायलट पेपरवर घ्यावी ? हे ठरविले पाहिजे,निवडणुकीमधील गुंडगिरी,दादागिरी,पैशाचा गैरवापर,जातीचा आणि धर्माचा आणि देवाचा वापर करणे,यास तात्विक राजकारण म्हणता येणार नाही,तर सत्तेसाठी काही पण,आपले कुटुंब उद्ध्वस्त झाले तरी चालेल,पण मला सत्ता हवी आहे,संपत्ती हवी आहे,हा हव्यास आणि लोभ म्हणजे तत्त्वाविना राजकारण होय. 

       सत्ताप्राप्तीसाठी जर तत्त्वाचा वापर नाही केला,सत्ता हे साध्य नसून केवळ परिवर्तनाचे आणि विकासाचे साधन आहे,ही माणसाची वैचारिक बैठक जोपर्यंत बसणार नाही,तोपर्यंत तत्वाचे राजकारण कोणीही कधीच करणार नाहीत,याचबरोबर गांधीजी सरदार पटेल नेहरू आणि त्यावरचे काँग्रेसचे सर्व धुरीण,घटनाकार बाबासाहेब आंबेडकर,बलिदान केलेले स्वातंत्र्य,सैनिक यांचे स्वप्न म्हणजे ‘ सार्वभौम भारत, सार्वभौम भारतीय जनता, समाजवादी भारत,धर्मनिरपेक्ष भारत,लोकशाही युक्त भारत ‘असे होते. 

       असा भारत घडविण्यासाठी त्याला स्वातंत्र्य, समता,बंधुभाव,न्याय या तत्त्वाचे अधिष्ठान देण्याचे त्यांचे स्वप्न होते.पण त्यांचे स्वप्न आज अपुरेच राहते की काय अशी शंका येण्यासारख्या अनेक घटना घडत आहेत.परत एकदा स्वातंत्र्याचे बंड करून उठावे लागेल की काय ? असा विचार विचारवंतांना पडलेला आहे.

        विचारवंतांना चिंतकांना असा प्रश्न का पडतो ? त्याचे कारण सत्तेला जेव्हा तत्त्वाचे अधिष्ठान नसते,किंवा तत्वाचे राजकारण केल्या जात नाही, तेव्हाच असा प्रश्न निर्माण होतो. 

       यासाठी जनतेचे अज्ञान,जनतेची अंधश्रद्धा,जनतेचा आळस,आणि जनतेतील धर्मांधता यावर मोठ्या प्रमाणात जनजागरण,प्रबोधन,जाणीव जागृती,करण्याची गरज आहे. साऱ्याच धर्माचे लोक हे धर्मांध झालेले आहेत,त्यातून अतिरेकी निर्माण झालेले आहेत,आज प्रत्येक धर्मात अतिरेक्यांच्या संघटना आहेत,आणि त्यांचा सत्तेवर ताबा मिळविण्यासाठी तत्व सोडलेले आहे.माणुसकी सोडलेली आहे, ते हिंस्रप्राण्यासारखे वागताना दिसत आहेत. 

       प्रत्येक धर्मातील ही धर्मांधता नष्ट करणे हा आयरणीवरचा प्रश्न होऊन बसला आहे.या प्रश्नाकडे जर समाजाने दुर्लक्ष केले तर,आज दुर्लक्ष केलं तर उद्या समाज उद्ध्वस्त होणार आहे,याचा गांभीर्याने विचार होणे जरुरीचे आहे.

        म्हणून प्रत्येकाने धर्माचा आधार किंवा कसोटी लावून विचार न करता आपापल्या धर्मातील जे धर्मांध आणि अतिरेकी आहेत,त्यांचे विचार कसे बदलता येईल ? यावर विचार आणि नियोजन होणे महत्त्वाचे आहे. 

          तसेच सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता किंवा धर्म त्याग या तीन गोष्टी पैकी एकाचातरी वापर केल्याशिवाय ही धर्मांधता आणि अतिरेकीपणा दूर होणे शक्य नाही. 

         म्हणून मतदार असो की उमेदवार असो त्यांनी राजकारण करताना राजकारण हे केवळ सत्तेसाठी न करता तत्त्वासाठीच केले पाहिजे,कारण तत्व सिद्धांत हे माणसाला उभे करण्याचे काम करतात,आणि तत्व आणि सिद्धांताचा वापर जे करीत नाहीत,त्यांना तत्व तत्त्वहीन विचार माणसाला आडवे पाडण्याचे काम करतात. किमान एवढे जरी समजले तरी बस आहे. 

                 लेखक

                  दत्ता तुमवाड

            सत्यशोधक समाज नांदेड…. 

   दिनांक : 29 मे 2026, फोन : 9420912209