Home Maharashtra देसाईगंज येथे ५ जून रोजी ओबीसींचा भव्य मोर्चा…

देसाईगंज येथे ५ जून रोजी ओबीसींचा भव्य मोर्चा…

   राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

देसाईगंज :- ओबीसींची जातनिहाय जनगणना आता होत असलेल्या जनगणनेत तातडीने करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाज संघटना, तालुका देसाईगंज यांच्या वतीने ५ जून रोजी देसाईगंज येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “अभी नहीं तो कभी नहीं” अशी घोषणा देत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ओबीसी समाजातील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

         हा मोर्चा सिंधू भवन ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, देसाईगंज असा काढण्यात येणार असून दुपारी ४ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. जातनिहाय जनगणना ही ओबीसी समाजाच्या हक्काची लढाई असल्याने कोणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता स्वतःहून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

          ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना न्याय मिळावा आणि समाजाची अचूक लोकसंख्या शासनासमोर यावी यासाठी हा मोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.