Home Maharashtra स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक………..  — “पॅकेज “ॲंड “पिकनिक” चा सस्पेन्स? 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक………..  — “पॅकेज “ॲंड “पिकनिक” चा सस्पेन्स? 

   लक्षवेधी

  प्रा.महेश पानसे. 

      सुरु असलेली पाण्याची चणचण व पुढे मान्सून पुर्व तयारी स्थानिक प्रशासनास करावयाची असताना आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतंर्गत १७ विधानपरिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत.

        विविध पक्षाच्या उमेदवारांची घोषणा झाली,नामांकन सुद्धा दाखल झालेले आहेत.यात दोन पोटनिवडणुका व इतर काही गत अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या विधानपरिषदेच्या जागांच्या निवडणूका होत आहेत. 

       वर्धा,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महानगर परिषदा,नगरपालिका,जिल्हा परिषद सदस्य यांचेसह पंचायत समिती सभापती यांचे मतदानाने विधानपरिषदेच्या एका आमदाराराचे नशीब टकाटक होणार आहे.

       मात्र यंदा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतीच अस्तित्वात नसल्याने मतदारांची संख्या रोडावून चुरस कमालीची वाढणार आहे.

      या मतदारसंघ संघात मतदार संख्या 15 ते 20 टक्यांनी घसरणार आहे.चंद्रपूर,वर्धा गडचिरोली मतदारसंघात विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील सावली नगरपंचायत,सिंदेवाही न.प.सदस्यांची पळवापळवी करण्यात आल्याची खबर व आता युती व आघाडी च्या नगरसेवकांच्या गोपनीय सभांचे सुरू झालेले आयोजन बघता या निवडणुकीत “पॅकेज” व “पिकनिक” वर भारी जोर देण्याचे युती व आघाडी तर्फे भरकस प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय गटांमध्ये चर्चा आहे. 

               चंद्रपूर,वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात गत अनेक वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका घेण्यात न आल्याने ग्रामीण क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या जि.प.सदस्य,पदाधिकारी व प. स.सभापतींना यावेळी मतदानाच्या अधिकारांपासून वंचीत राहावे लागणार आहे.

         अशा स्थितीत चंद्रपूर,गडचिरोली,वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूकीला लक्षात घेता आता महानगर पालिका,नगर परिषद,व नगर पंचायत सदस्य यांचे भाव वधारणार आहेत हे निश्चित.    

       निवडणूक न झाल्याने चंद्रपूर जिल्ह्या परिषदेतील ५७ सदस्य मतदार संख्या तर १५ पंचायत समिती सभापती मतदार संख्या असे एकूण ७२ मतदार जिल्ह्यातून कमी झालेले आहेत.

        गडचिरोली जिल्हा परिषदेतील व जिल्ह्यातील १२ पंचायत समिती सभापतींचा मौलिक अधिकार यावेळी कवडीमोल ठरणार आहे.वर्धा जिल्हा परिषद सदस्यांसह येथील ८ पंचायत समिती समिती सभापती घटनेने दिलेला आपला मतदानाचा मौलिक अधिकार गाजवू शकणार नाहीत हे विशेष. 

        चंद्रपूर,गडचिरोली व वर्धा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूकीत आता फक्त ९७७ मतदार आपला मतदानाचा अधिकार गाजवतील.

         जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती अस्तित्वात असते तर कदाचित ही संख्या १५० ते २०० नी वाढली असती व चित्रही वेगळे असते असे बोलले जाते.

           राज्यात नुकत्याच न. प.,नगर पंचायत निवडणूका संपन्न झाल्यात.यात निवडून आलेल्यांना मोठा चुना लागल्याचे बोलल्या गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीकडे ‘दुभती गाय’ म्हणून बघितल्या जाऊ शकते असे जाणकार बोलतात.

           त्यातही या मतदार संघात युती व आघाडी संख्याबळ उन्नीव,बिस असल्याने विरोधी पक्षातील मतदारांना “पॅकेज ” व स्व पक्षातील मतदारांची शाही ” पिकनिक” असे नियोजन करण्यात आल्याची चर्चा आहे.

        चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस नगरसेवक यांची गोपनीय सभा गत चार दिवसाआधीच नागपूरात संपन्न झाल्याचे कळते.तर भाजपा वाल्यांची चंद्रपूरातील एका नामी हाॅटेलात नियोजन सभा पार पडल्याची चर्चा आहे.

         या आधीच जिल्ह्यातील काही कांग्रेसी न. प.सदस्यांची पळवापळवी एका आमदारांनी केल्याची चर्चा राहिली आहे.मतदारांचा सुहाना सफर कुठला असेल किंवा पॅकेज किती पेटीचा असेल हे निश्चित पणे सांगता येणारे नसले तरी चुरस बघता हा आकडा दिलखुष करणारा असेल असे खुद्द नगरसेवकांच्या फुललेल्या चेहऱ्यावरील लाली वरून लक्षात येऊ शकेल.

          गत स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पॅकेज ४ ते ५ पेटीच्या घरात असल्याची चर्चा होती. 

             जिल्ह्यात पाणीटंचाई ला धरून न.प.प्रशासनास शिव्याशाप देत आहेत व पुढील काही दिवसात मान्सून चे आगमन बघता पुर्वतयारी अपेक्षित आहे.अशा स्थितीत न.प.पदाधिकारी व सदस्य यांना पुर्ण वेळ नगरात उपस्थित राहणे अगत्याचे आहे.

         स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर “पॅकेज”व “पिकनिक” ला लाथाडून किती नगरसेवक जनतेच्या सेवेला प्राधान्य देतात हे लवकरच कळेल असे जाणकार बोलतात.