माऊलींच्या पालखी रथाला बैलजोडीचा मान आळंदीतील भोसले कुटुंबाला… — तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांना बैलजोडीचा मान…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्‍या मानाच्या बैलजोडीचा मान यंदाच्या वर्षी आळंदीतील भोसले घराण्याला मिळाल्याची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. बैलजोडी समितीच्या बैठकीला समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्‍हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्‍हाडे, रामदास भोसले, माऊली वहीले आदी सदस्य उपस्थित होते. आळंदीतील प्रगतशील शेतकरी तुळशीराम भोसले व रोहीत भोसले यांना बैलजोडी जुंपण्याचा मान देण्याचा निर्णय बैठकीत झाला. तुळशीराम भोसले यांना बैलजोडीचा मान मिळाल्याने देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी शाल श्रीफळ देवून सन्मान केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, पांडुरंग भोसले, संतोष भोसले, गोपीनाथ भोसले, रोहित भोसले, तसेच भोसले परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुऱ्हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहीले, रानवडे कुटुंबालाच मिळतो, आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालूं आहे.असे बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी सांगितले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडीचा मान मिळाल्याने भोसले कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.