ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- आरमोरी तालुक्यातील वैरागड नजीकच्या मेंढा या आदिवासीबहुल गावातील आदिवासी कुटुंबात जन्मास येऊन स्वकर्तृत्वाने अकोला शहरातील नामवंत दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी,अकोला द्वारा संचालित, नॅक (NAAC) बेंगलोर द्वारा अ+ मानांकन प्राप्त सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. दिलीप दामू कुमरे यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या मानव्य विद्याशाखेंतर्गत समाजशास्त्र विषयात नुकतेच “गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समुदायावर नक्षलवादी चळवळीचा झालेला परिणाम : एक समाजशास्त्रीय अध्ययन” या संशोधन विषयावरील आचार्य (पीएच.डी.) पदवीने सन्मानित करण्यात आले.त्यांना या संशोधन कार्यासाठी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी येथील माजी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाबू एम.कऱ्हाडे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.त्यांनी केलेले हे संशोधन बहुआयामी स्वरूपाचे असून शासनाने त्यांच्या संशोधनाचा सकारात्मक विचार केल्यास प्रा. डॉ. दिलीप कुमरे यांनी नक्षलवादी चळवळीचे अध्ययन करतांना या चळवळीद्वारा आदिवासी समुदायावर पडलेल्या सकारात्मक – नकारात्मक प्रभावाचे संशोधनाद्वारा प्राप्त झालेले निष्कर्ष आणि उपाययोजनांचा दुर्गम, डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या,शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी,वीज,दळणवळणांच्या सोयी यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या भोळ्या -भाबड्या निरक्षर आदिवासी समुदायाच्या उत्थानासाठी विविध विकास योजना राबवितांना शासनाला मार्गदर्शक तत्वे ठरू शकतात असे प्रतिपादन गोटुल बहुद्देशीय समिती, आरमोरीचे संस्थापक सचिव तथा प्रा.डॉ. दिलीप कुमरे यांचे शैक्षणिक गुरु आणि मार्गदर्शक,जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी सदस्य प्रा. दौलतदादा धुर्वे यांनी व्यक्त केले.ते प्रा. डॉ. दिलीप कुमरे यांनी आचार्य (पीएच. डी.) पदवीसाठी सादर केलेल्या शोध प्रबंधाबाबत समीक्षकाच्या दृष्टिकोनातून विचार व्यक्त करतांना बोलत होते.
प्रा. डॉ.दिलीप कुमरे यांचे संशोधन यापुतेच मर्यादित नसून त्यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून समाजशास्त्र विषयात एम.फिल.पदवी प्राप्त करतांना ” भामरागड तालुक्यातील माडिया आदिवासींचे आधुनिकीकरण :- एक समाजशास्त्रीय अध्ययन ” हा संशोधन विषय घेऊन संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे. त्यांचा संशोधनाचा आवाका मर्यादित नसून त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग (यु.जी.सी.) नवी दिल्लीच्या अनुदानातून “माडिया आदिवासींच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन” (विशेष संदर्भ:- भामरागड तालुका,जिल्हा गडचिरोली) या संशोधन विषयाला अनुसरून त्यांनी लघु-शोध प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग, (यु.जी.सी.) नवी दिल्ली येथे सादर केलेला आहे.
ते अकोला सारख्या शहरांमध्ये सेवा देत असले तरी त्यांनी आपल्या जन्म गावाशी आणि समाजाशी तसेच गडचिरोली जिल्ह्याशी अजूनही नाळ जुळवून ठेवलेली आहे. ते आदिवासी व गैर आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे सक्रिय सभासद असून गोटुल बहुउद्देशीय समिती, आरमोरीचे सहसचिव म्हणून काम बघतात. गोटूल समितीच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी परिश्रम घेत आहेत. समाजाशी असलेली आत्मियता आणि आपुलकी आणि संशोधनाबाबत असणारी तळमळ लक्षात घेता त्यांना गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात सेवेची संधी मिळाल्यास त्यांच्या विविध क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग गडचिरोली जिल्ह्याला निश्चितपणे होईल असे प्रतिपादन प्रा.दौलतदादा धुर्वे यांनी केले आहे.



