राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा : कुरखेडा-वडसा मुख्य रस्त्यावर अचानक हत्तींचा कळप रस्ता ओलांडताना दिसून आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कळप गोठणगाव रेंज (गोंदिया)ला होता,तिथून पुन्हा परत कसारी जंगलातून रावणवाडी (गौंड टोली) परिसराकडे मार्गक्रमण करत असून पुढे डोंगरमेंढ (तील्डा) जंगलाच्या दिशेने जात असल्याचे खात्रीशीर सांगितले जात आहे. रस्त्यावर अचानक हत्ती आल्यामुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांनी आपली वाहने थांबवूनह सुरक्षित अंतर राखले.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या हालचालीमुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नागरिकांनी व शेतकर्यांनी या संदर्भात स्थानिक आमदार रामदास मसराम यांना दूरध्वनि द्वारे तत्काळ कळविले असता आमदार रामदास मसराम यांनी वन विभागाला माहिती दिली असून तात्काळ उपाययोजना करण्याचा सुचना दिल्या आहेत.
वन विभागाने या भागात गस्त वाढवून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे तसेच हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून संभाव्य धोका टाळावा अश्या सुचना आमदारांनी दिल्याचे कळाले. दरम्यान, नागरिकांनी जंगल परिसरात जाताना व रात्रीच्या वेळी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



