दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : खेड तालुक्यातील मरकळ येथील शेतकरी कन्या स्नेहल पोपट लोखंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करत स्टेट टॅक्स असिस्टंट (जीएसटी विभाग) पदावर निवड मिळवली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्नेहल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मरकळ येथेच झाले. त्यानंतर वाघोली येथे विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करत त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी हार न मानता शिक्षण सुरू ठेवले. राज्य सरकारच्या ‘सारथी’ शिष्यवृत्ती योजनेमुळे त्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळाला. पुण्यात राहून त्यांनी सलग तीन ते चार वर्षे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. २०२१ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली; मात्र अंतिम यश थोडक्यात हुकले.
अपयशाने न खचता त्यांनी पुन्हा जोमाने तयारी सुरू ठेवली. २०२३ मध्ये जलसंपदा विभागात त्यांची निवड झाली. त्यानंतर २०२४ मध्ये महसूल सहायक (महिला व बालविकास विभाग) पदावरही त्यांनी यश मिळवले. सेवेत असतानाही सातत्याने अभ्यास करत त्यांनी अखेर एमपीएससीच्या माध्यमातून स्टेट टॅक्स असिस्टंट पटकावले.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, भाऊ, मित्र-मैत्रिणी तसेच ‘सारथी’ योजनेला दिले. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर यश निश्चित मिळते,” असा प्रेरणादायी संदेश स्नेहल यांनी दिला.



