टाळमृदंगाच्या गजरात माऊली-सोपानकाकांची हृद्य बंधुभेट…

दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक

      वेळापूर : संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानकाका यांच्या पालख्यांचे पंढरपूर वारीला प्रस्थान झाल्यापासून या दोन्ही संत बंधुंची पहिल्यांदाच माळशिरस तालुक्यातील दसूर पाटी या ठिकाणी आज (दि. २६) सायंकाळी पाच वाजता भेट झाली. वारकऱ्यांनी टाळमृदंगाच्या गजरात हा बंधुभेटीचा सोहळा साजरा केला.

       वेळापूर मुक्कामी माऊलींची पहाटेची नित्यपूजा, आरती झाल्यानंतर सकाळी ढगाळ वातावरणात सोहळा ठाकुरबुवा समाधी या रिंगणाच्या ठिकाणी मार्गस्थ झाला. सव्वा आठ वाजता तिथे पोहोचल्यावर चोपदारांनी रिंगण लावून घेतले. श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी रिंगणाची पाहणी केली. पावणे नऊ वाजता भोपळे दिंडीचा ध्वज, त्यानंतर अश्वांनी नेत्रदीपक दौड करीत तीन फेऱ्या पूर्ण केल्या. अश्वांच्या टापाखालील माती भाळी लावत भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले.

        या रिंगण सोहळ्यानंतर वारकरी विविध खेळ खेळण्यात दंग झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर सर्व दिंड्या माऊलींच्या पालखीभोवती गोलाकार बसल्या. टाळमृदंगाच्या निनादात ‘माऊली माऊली’ असा जयघोषात विणेकऱ्यांनी माऊलींना प्रदक्षिणा घातली. वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या निनादाने आसमंत भारून टाकला. उडीच्या कार्यक्रमानंतर माऊलींची पालखी ठाकुरबुवा मंदिरात आणण्यात आली. ठाकुरबुवा हे माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी होते. त्यांनी वारीच्या वाटेवर याच ठिकाणी देह ठेवला. त्यांच्या समाधीवर माऊलींच्या पादुका ठेवून पूजा करण्यात आली. त्यानंतर सोहळा तोंडलेबोंडलेकडे मार्गस्थ झाला.

       सकाळी ११ वाजता सोहळा तोंडलेबोंडले येथे पोहोचला. ग्रामस्थांनी तोफाची सलामी देत गुलाबपाणी आणि पुष्पवृष्टी करीत सोहळ्याचे स्वागत केले. सोहळा दुपारी नंदाच्या ओढ्यावर तोंडले येथे विसावला.

       दुपारी एक वाजता सोहळ्याची वाटचाल सुरू झाली. याच वेळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी अंगावर झेलीत संत सोपानकाका आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सायंकाळी पाच वाजता दसूर पाटी येथे पोहोचली. सरपंच वंदना कागदे, उपसरपंच धनंजयराव सावंत आणि गावकऱ्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. याच या ठिकाणी दोन्ही बंधुंच्या भेटीचा सोहळा पार पडला.

       संत सोपानदेव सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त प्रशांत सुरू यांना श्रीफळ प्रसाद देवून सन्मान केला. यावेळी टाळ्यांच्या गजरात भाविकांनी ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ असा जयघोष केला आणि संतांचे दर्शन घेतले.

       माळशिरस तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी नामदेव टिळेकर, पोलिस उपअधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते आदीनी संतांच्या सोहळ्याला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप दिला. तर पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, उपअधिक्षक अर्जुन भोसले आदींनी संतांच्या सोहळ्याचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांचे पालखी सोहळे सायंकाळी भंडीशेगाव मुक्कामी विसावले.