अंत्ययात्रेतील नागरिकांवर मधमाशांचा हल्ला… — मृतदेह खाली ठेवून नागरिकांनी ठोकली धूम…

प्रितम जनबंधु

   संपादक 

         भंडारा : तुमसर तालुक्यातील सालई शिवारात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शुभम भोयर याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर बाम्हणी स्मशानघाटात मधमाशांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. यात सुमारे २०० नागरिक जखमी झाले. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेतील नागरिकांनी सैरावैरा धूम ठोकली. तिरडी घेऊन जाणाऱ्या नागरिकांनी शेवटी मृतदेह खाली ठेवून नदीत उडी मारून मधमाशापासून आपली सुटका केली असल्याचे समजते.

         शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास शुभम भोयर व मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन आदळली. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला होता. त्याची अंत्ययात्रा स्वगावी बाम्हणी येथे रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास वैनगंगा नदी काठावरील स्मशान घाटावर गेली.

          दरम्यान, मधमाशांनी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात नागरिकांची तारांबळ उडाली व जिकडे रस्ता मिळेल तिकडे नागरिक पळू लागले. काहींनी उभ्या शेतातील उसाच्या वाढीत तर काहींनी धानाच्या शेतीत आश्रय घेतला. काही नागरिक गावाच्या दिशेने दुचाकीने व काही नागरिक धावत सुटले. मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे दोनशे नागरिक जखमी झाले.

तिरडी सोडून वैनगंगा नदीत घेतली उडी…

          तिरडी घेऊन जाणारे पाच ते सहा नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यांना काय करावे हे कळलेच नाही. शेवटी जीव वाचविण्यासाठी त्यांनी तिरडी खाली ठेवून थेट वैनगंगा नदी पात्रात उडी मारली. त्या सर्वांनी पोहत समांतर काठावर बाहेर निघाले.