अत्याधुनिक सुविधा असलेली मेगा रुग्णवाहिका वारकऱ्यांच्या सेवेत…  — केंद्रीय मंत्री आठवले यांच्या निधीतून वारकरी साहित्य परिषदेला रुग्णवाहिका…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पंढरपूर : मुखी हरिनामाचा जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाची आस लावून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. महाराष्ट्राला हजारो वर्षांची वारकरी परंपरा आहे. संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराज पालखींसोबत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. ऊन, पावसाची पर्वा न करता वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. त्यात काही वारकऱ्यांना आरोग्याचा त्रास होतो तेव्हा वारकरी साहित्य परिषद वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी पुढे सरसावते.

         वारी दिंडीच्या पालखी मार्गावर अनेक संस्था वारकऱ्यांची सेवा करतात. त्यातील एक म्हणजे वारकरी साहित्य परिषद या संस्थेने यंदा वारीत वारकऱ्यांसा अत्याधुनिक सुविधांनी उपलब्ध असलेली रुग्णवाहिका वारीत उपलब्ध करून दिली आहे. ही रुग्णवाहिका केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज पाटील यांनी यावेळी सांगितले.

          केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून वारकरी साहित्य परिषदेला दिलेल्या अत्याधुनिक सुविधांनी उपलब्ध असलेली रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्या हस्ते वेळापूर येथे करण्यात आला. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील, खासदार संजय जाधव, परिषदेचे मुख्य सल्लागार हभप चैतन्य महाराज लोंढे, भाजपचे नेते डॉ.राम गावडे, गणेश कऱ्हाडे, हभप वेद महाराज लोंढे यावेळी उपस्थित होते.

        नैसर्गिक वातावरणामुळे वारकऱ्यांना पायी दिंडी सोहळ्यातून चालताना होणारे आजार, ताप, पाय दुखणे, कधी अपघात घडल्यास तातडीने छोटी शस्त्रक्रिया, श्वसनाचे आजार, हृदय रोग, नेत्र चिकित्सा अशा प्रकारे तातडीने उपचार केले जातात. त्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असणारी रुग्ण वाहिका वारकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आली आहे असे हभप चैतन्य महाराज लोंढे यांनी सांगितले.