मोबाईलच्या वापरापासुन पाल्यांना दुर ठेऊन नैसर्गिक जडणघडण करण्यास पालकांनी प्रयत्नरत असावे… — जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु यांचे प्रतिपादन…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज-

     अलिकडे अल्पवयात मोबाईलचा वापर अती प्रमाणात होऊ लागल्याने याचे अनेक गंभीर परिणाम अल्पवयातच मुलांवर होत असल्याचे दिसून येत आहे. मोबाईलच्या आहारी गेलेली मुले आवश्यक ज्ञानार्जन करण्याचे सोडुन गैरवापर करीत असल्याने वाट चुकताच गंभीर परिणाम भोगण्यास विवश होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेता पालकांनी मोबाईलच्या वापरापासुन पाल्यांना दुर ठेऊन नैसर्गिक जडणघडण करण्यास प्रयत्नरत असने गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरु यांनी केले.

   ते देसाईगंज येथील राजेंद्र वार्डातील मिनल काॅन्व्हेंट येथे आयोजित वार्षीक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शालु दंडवते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती अर्चना ढोरे, जावेदखान पठाण,मारोती नागमोती, ॲड. ज्युईली मेश्राम, इम्रान पठाण, प्राचार्य सलमा खान प्रामुख्याने उपस्थित होत्या.

     दरम्यान मार्गदर्शन करताना गुरु म्हणाले की मोबाईल वापराचे अनेक फायदे असले तसे नुकसानही आहेत. मोबाईलच्या अती वापरामुळे अल्पवयातच मुलांच्या डोळ्यावर परिणाम होत असुन अमूल्य वेळ व्यर्थ जात असल्याने आवश्यक ते संस्कार रुजत नाहीत. परिणामी ध्येयापासून मुले भटकण्याची दाट शक्यता लक्षात घेता वेळ राहता पालकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगीतले. आयोजित कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे अध्यापक, कर्मचारीवृंदांनी अथक परिश्रम घेतले.