पूर्व विदर्भात दमदार पाऊसामुळे पूर परिस्थिती… — गावात शिरले पाणी…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

भंडारा:पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात संततधार पावसाने पुरती दाणादाण उडाली आहे. पुरामुळे काही मार्ग बंद झतर अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.

      भंडारा जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) दोन तास धो-धो पाऊस बरसला. परिणामी, लाखांदूर तालुक्‍यातील सरांडी बु. येथील नाले तुडुंब भरून वाहत होते. दरम्यान, गावातील रस्ते उंच आणि घराचा भाग सखल झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. नंदा भरणे, हेमलता मिसार, भूपेश बुराडे, मनीषा बुराडे, तुलाराम बुराडे, हिरामण दोनाडकर, ईश्‍वर कुथे यांच्यासह अनेकांच्या घरात पाणी जमा झाले. अर्धवट नाली बांधकाम व रस्ते कामांमुळे हा प्रकार घडला.

         विरली जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी शिरले. पाणी ओसरण्यास दोन ते तीन दिवस लागतील. तोवर शाळा बंद राहण्याची शक्‍यता आहे. वर्ग एक ते सातवीपर्यंतचे २२० विद्यार्थी आहेत. लाखनी तालुक्‍यातील किटाडी ते विरली मार्गावर किटाडी पुलावरून पाणी वाहत होते.

        परिणामी, वाहतूक बंद करण्यात आली. सिल्ली परिसरात चांगुणा चंद्रहास बागडे या विधवा महिलेचे मातीचे घर कोसळले. चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. सोयाबीन व कपाशीला यामुळे जीवदान मिळाले आहे.

       गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ४९.४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामध्ये सर्वाधिक ९०.८ मिलिमीटर पाऊस धानोरा तालुक्‍यात झाला. वैरागड येथे गिरिधर सोनवणे यांच्या मातीच्या घराची पडझड झाली. गोंदिया जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुजारीटोला धरणातून बाघ पाटबंधारे विभागाच्या कालव्यात विसर्ग करण्यात येत होता.

       शनिवारी (ता. १९) हा कालवा फुटला. परिणामी, कालव्याचे पाणी परिसरातील घरे आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांत शिरले. दरम्यान, याची माहिती मिळताच कालव्याचा विसर्ग बंद करण्यात आला.