कटकवार विद्यालयात 22 वे 10 दिवसीय निःशुल्क निसर्ग अभ्यास शिबीर… — ग्लोबल नेचर क्लबचा वर्ष 2001 पासून सातत्याने चालू असलेला पक्षी व निसर्ग अभ्यास शिबीर… — पक्षी व निसर्ग या विषयावर 10 ही दिवस वाहून घेतलेला महाराष्ट्रातील एकमेव निःशुल्क निसर्गशिबीर… — ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व वन्यजीव विभाग साकोली चे निसर्गशिबिरासाठी सहकार्य…

    चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

साकोली :- कृष्णमूरारी कटकवार हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयातील महाराष्ट्र शासन पुरस्कृत “माझी वसुंधरा 4.0” अंतर्गत पर्यावरण सेवा योजना तसेच राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे मागील 22 वर्षांपासून उन्हाळी 10 दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिराचे निःशुल्क आयोजन करीत असून यावर्षी सुद्धा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 22व्या 10 दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिराचे आयोजन यशस्वीरीत्या केले गेले.

           अशा प्रकारे करोना महामारीचे दोन वर्षे वगळता वर्ष 2001पासून सातत्याने निःशुल्करित्या पक्षी व निसर्गअभ्यास या विषयावर 10 ही दिवस 22 वर्षांपासून कोणताही खंड न पडता दरवर्षी आयोजन करणे हे अश्या प्रकारचे विदर्भातीलच नाहीतर महाराष्ट्रातील सुद्धा एकमेव पक्षी व निसर्गअभ्यास शिबीर आहे.

          महाराष्ट्रात सर्वत्र ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीर तसेच संस्कार शिबिराचे किंवा इतर व्यक्तिमत्त्व विकास,वक्तृत्व, छंद,नृत्य प्रकारातील शिबिराचे आयोजन सर्वत्र होत असते.

           पण पक्षी ओळख व निसर्गातील इतर घटकांची ओळख परिचय 10 ही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरार्थीना प्रत्यक्ष निसर्गभ्रमंती करून निसर्गाचे धडे शिकविणारा हा महाराष्ट्रातील एकमेव शिबीर असल्याची माहिती संघटक प्रा.अशोक गायधने यांनी दिली आहे.

             निसर्गशिबिराला दहाही दिवस मार्गदर्शन माझी वसुंधराब4.0 योजने अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनाचे योजनाप्रमुख प्रा.अशोक गायधने,निसर्गमित्र युवराज बोबडे ,रोशन बागडे यांनी केले. निसर्गशिबिराला 10ही दिवस सहकार्य पुष्पा बोरकर,अंजना रणदिवे यांच्यासमवेत निसर्गस्वयंसेवक युवराज बोबडे,पूर्वा बहेकार, रुणाली निंबेकर, रोहिणी भैसारे यांनी तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोली यांनी सहकार्य केले.निसर्गशिबिरार्थीना या उन्हाळी ग्रीष्मकालीन निःशुल्क निसर्गशिबिराद्वारे ” उन्हाळ्याची सुट्टी निसर्गाशी गट्टी” चा प्रत्यय अनुभवता आला.

         या दहाही दिवसात 100 पेक्षा जास्त पक्ष्यांची इंग्रजी मराठी नावासहित दुर्बिणीद्वारे प्रत्यक्ष परिचय व काही स्थलांतरित पक्ष्यांचा सुद्धा परिचय निसर्गशिबिरार्थीना वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या निसर्गभ्रमंती मध्ये झाला.

         याचसोबत 30 पेक्षा जास्त फुलपाखरे तसेच अनेक पाल ,सरडे ,कीटक ,वनस्पती तसेच विविध प्रजातींचे साप विषारी- बिनविषारी सापांचा परिचय इंग्रजी मराठी नावासहित व सोबतच दुर्बिण- टेलिस्कोप व सोलर फिल्टर्स चष्म्याद्वारे सायंकाळ रात्रीचे खगोल निरीक्षणाचा प्रत्यक्षरीत्या परिचय शिबिरार्थीना करवून देण्यात आला.

          प्रथम दिवशी शालेय परिसर व नवतळा परिसरात निसर्गभ्रमंती करून एकूण 30 प्रकारचे पक्षी व 8 प्रकारच्या फुलपाखरांची तसेच विविध किटक ,सरपटणारे सरडे- पाल व वनस्पतींची ओळख प्रत्यक्षात दुर्बिणीद्वारे इंग्रजी मराठी नावासहित करून देण्यात आली. दुसऱ्या दिवशी जैवविविधता उद्यान साकोली व पाटबंधारे वसाहतीत निसर्गभ्रमंती करण्यात आली.

         याच ठिकाणी लावलेले फलकाद्वारे विविध पक्षी ,वन्यप्राणी तसेच अनेक फुलपाखरांचा परिचय शिबिरार्थीना करून देण्यात आला.याठिकाणी 20 पक्षी व 10 फुलपाखरांचा परिचय प्रत्यक्षात झाला.याच ठिकाणी शिबिरार्थीनी वडाच्या पारंब्यावर झुलण्याचे साहस करून बालपणीचा निसर्गानंद अनुभवला.तिसऱ्या दिवशी नर्सरी पहाडी येथे निसर्गभ्रमंती व हिल ट्रेकिंग तसेच चौध्या दिवशी सुद्धा साकोली गावतलाव व गडकुंभली पहाडी येथे निसर्गभ्रमंती व हिल ट्रेकिंगचा आनंदी अनुभव निसर्गशिबिरार्थीना प्राप्त झाला.

          याच ठिकाणी विषारी बिनविषारी सापांचा परिचय सर्पमित्र युवराज बोबडे याने चार्टद्वारे करून दिला.या ठिकाणी 28 प्रकारचे पक्षी व 8 प्रकारचे फुलपाखरे, सर्पमित्र युवराज बोबडे याला आढळलेली छोटी घोरपड यांचा परिचय झाला. पाचव्या दिवशी शिवणीबांध तलाव येथे निसर्गभ्रमंती करून एकूण 55 प्रकारचे पक्षी व विविध फूलपाखरे,कीटक,सरपटणारे प्राणी यांचा परिचय तसेच मत्स्यकेंद्र ,सामाजिक वनीकरण रोपवाटिका आणि शिवमंदिर येथे निसर्गभ्रमंती करण्यात आली.

        याच ठिकाणी प्रा.अशोक गायधने यांनी विविध पक्षी- फुलपाखरे ,वनस्पती कोळी ,चतुर,वन्यप्राणी यांचे छायाचित्रे तसेच चार्टद्वारे मार्गदर्शन करून शिबिरार्थीच्या ज्ञानात भर घातली.सहाव्या दिवशी आलेबेदर व भीमलकसा तलावावर निसर्गभ्रमंती तर सातव्या दिवशी सेंदूरवाफा गावतलाव आणि रानतलाव येथे निसर्गभ्रमंती करण्यात आली दोन्ही ठिकाणी अनुक्रमे 27 व 24 प्रकारचे पक्षी व 8 प्रकारचे फुलपाखरे आढळली.

          याठिकाणी सर्पमित्रांनी नुकतेच पकडलेले विषारी बिनविषारी साप बरणीतून शिबिरार्थीना दाखविण्यात आले व त्यांची भीती ,गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यात आले. आठव्या दिवशी रात्रीला खगोलनिरीक्षणात ग्रह,नक्षत्र ,तारे,आकाशगंगा, रास व सूर्य तसेच चंद्र यांचे निरीक्षण करून संपूर्ण खगोलाचा प्रत्यक्ष परिचय खुल्या निरभ्र रात्रीच्या आकाशात शिबिरार्थीना करून देण्यात आला.नवव्या दिवशी कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे निसर्गभ्रमंती करून कृषिवैज्ञानिक योगेश महाले, प्रमोद पर्वते, डॉ प्रशांत उंबरकर, कपिल गायकवाड ,आशा इधोळे व जागेश्वर कापगते यांचे मार्गदर्शन घडले.

             स्वयंचलित हवामान केंद्र, ओझोला खत,मधमाशीपालन केंद्र,प्रकाश सापळा,विविध कृषी यंत्रे,गांडूळखत प्रकल्प,मत्स्यपालन शेती ,कृषी जनावरे,कुक्कुटपालन, बकरीपालन,फळबागा, हवामानाचे विविध अँप यावर भरगच्च माहिती शिबिरार्थीना प्राप्त झाली.

           याच ठिकाणी निसर्गभ्रमंतीमध्ये 30 प्रकारचे पक्षी व 5 प्रकारचे फुलपाखरे आढळल्यावर प्रा. अशोक गायधने यांनी अनेक खगोल चार्टद्वारे आदल्या दिवशी प्रत्यक्षात पाहिलेले खगोलनिरीक्षण , ग्रह, तारे ,नक्षत्रे, रास यांवर व यासोबतच सूर्यमाला, इसरोची मंगळ, चांद्र व सूर्य मोहिमेची विस्तृत माहिती दिली.

             दहाव्या दिवशी नागझिरा अभयारण्य इथे एनएनटीआर वन्यजीव विभाग नागझिरा यांचे सहकार्याने निसर्गभ्रमंती करून 30 पेक्षा जास्त विविध दुर्मिळ पक्षी 4 प्रजातीचे गरुड ,घुबड व 7 पेक्षा जास्त फुलपाखरे व इतर वन्यप्राण्यांचे दर्शन घडले.

         वनक्षेत्राधिकारी बारसागडे व आर.एफ.ओ बळीराम भुते यांचे सहकार्याने नागझिरा निसर्गभ्रमंती यावेळी वैविध्यपूर्ण व आगळीवेगळी ठरली.

          10 दिवसीय निसर्गशिबीराचे उत्कृष्ट शिबिरार्थी तसेच शिबीर सहभाग प्रमाणपत्राचे वाटप पिटेझरी वनक्षेत्र आरएफओ बळीराम भूते यांचे हस्ते पिटेझरी वनसंकुल परिसरातील बायसन पर्यटक कुटीमध्ये करण्यात आले.

           पूर्वा बहेकार, रोहिणी भैसारे,अथर्व बहेकार यांनी 10 दिवसाचे उत्कृष्ट निसर्गाअनुभव व मनोगत सादर केले.

          उत्कृष्ट निसर्ग शिबिरार्थी प्रमाणपत्र क्रिशा भांडारकर,अथर्व बहेकार, रुणाली निंबेकर, रोहिणी भैसारे, पूर्वा बहेकार,विराग गेडाम,संघदिप तरजूले, सुयोग तरजूले यांना देण्यात आले.

           तसेच डॉली कोडापे, तृषा जांभूळकर, आलिया टिकेकर, जान्हवी धकाते, ईशिका काळसर्पे,अंश घोरमारे, यांना उत्कृष्ट सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

        निसर्गमित्र युवराज बोबडे,सुरेंद्र राऊत,समीर राऊत,भोवते यांना उत्कृष्ट शिबीर सहाय्यक म्हणून आर एफ ओ बळीराम भुते यांचे हस्ते गौरविण्यात आले. आभार प्रदर्शन रुणाली निंबेकर हिने केले.निसर्गशिबिरात एकूण 30 निसर्गशिबिरार्थीनी सहभाग नोंदविला.

           22 व्या 10 दिवसीय पक्षी व निसर्गशिबिराला यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विजय देवगिरकर,प्रा.जागेश्वर तिडके, पुष्पा बोरकर, अंजना रणदिवे,निलिमा बोरकर,प्रा.एस.एन. साहू, बाळकृष्ण लंजे,प्रा.पी.के. शिवणकर,प्रा.एन.आर.भदाडे, प्रा.के.टी कापगते, प्रा.व्ही. डी. हातझाडे,प्रा.आर. के भालेराव,प्रा.डी.एस.लांजेवार, क्रिडा प्रमुख संजय भेंडारकर,एस.एस. लांजेवार,शिवपाल चन्ने,दिनेश उईके,संजय पारधी, कृष्णा बिसेन,प्रा.कमलेश मडकवार,अविनाश मेश्राम,हरिश्चंद्र सोनवाने व इतर सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.