Home देशविदेश रमी’त रमनाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या :- डॉ.हुलगेश चलवादी… — राज्यकर्त्यांविरोधात अविश्वासाचे...

रमी’त रमनाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या :- डॉ.हुलगेश चलवादी… — राज्यकर्त्यांविरोधात अविश्वासाचे वातावरण…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादिका 

दिनांक २१ जुलै २०२५, पुणे

       मदतीच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत त्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या आणि रमीत रमनाऱ्या ‘रमीबाज’ कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.२१) केली. 

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना घरचा रस्ता दाखवत बळीराजाला न्याय द्यावा, अशी आग्रही भूमिका डॉ.चलवादी यांनी मांडली.गेल्या काही काळात विधिमंडळात घडणाऱ्या घडामोडींवरून राज्यकर्त्यांविरोधात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा दावा देखील डॉ.चलवादी यांनी केला. राज्य मंत्रिमंडळातील अकार्यक्षम मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी बसपाकडून करण्यात आली आहे.

        राज्यात २०२५ च्या पहिल्या तिमाहीत, अर्थात जानेवारी ते मार्च दरम्यान तब्बल ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.दररोज सरासरी आठहून अधिक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. २०२४ मध्ये २,६३५ तर २०२३ मध्ये २,८५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

       गेल्या दहा वर्षांत राज्यात ३७,००० हून अधिक शेतकऱ्यांनी जीवन संपवले.शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी राज्याला संवेदनशील कृषिमंत्र्याची गरज होती. पंरतु, विद्यमान कृषिमंत्र्यांच्या असंवेदनशीलतेमुळे बळीराजाच्या तोंडाला पाने पुसली जात आहे, अशी खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

        यंदाच्या पावसाळ्या पूर्वीच अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांमुळे राज्यात २९,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. विशेषतः नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना या आपत्तींमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.राज्य सरकारने नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश दिले असून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. 

        मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वाढता कल पाहता, केवळ आर्थिक मदतीपेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता अधिक आहे.अशात धोरण आखण्याची जवाबदारी असलेले हात, रमी खेळण्यात गुंतले असतील, तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघावे? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला.