चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली : सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात कारने ट्रॅक्टरला धडक दिली. या घटनेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना १९ ऑगस्ट रोजी साकोली लाखांदूर फाट्यावर सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान घडली. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले. परंतु कारचालकासह चार शिक्षक थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे.
सविस्तर,शनिवारला सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय आश्रमशाळा ककोडी येथील प्राचार्य संजय बोडघरे (वय ३०) हे कारने चार शिक्षकांना घेऊन नागपूरकडे जात होते. दरम्यान, लाखांदूर फाटा येथे साकोलीवरून कुंभलीकडे जाणारा सायकलस्वार राजेश बर्वे (३२) हा अचानक गाडीच्या समोर आला. त्याला वाचवण्याच्या नादात लाखांदूरकडून साकोलीकडे येणाऱ्या ट्रॅक्टरला कार आपटल्याने कारच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले. परंतु, कारमधील एअरबॅग उघडल्याने कारचालक संजय बोडघरे यांच्यासह चारही शिक्षक किरकोळ जखमी झाले.
ट्रॅक्टर चालक कमलेश लांजेवार हा लाखांदूर रस्त्याने शेतातील कामे आटोपून घरी जात असताना कार लाखांदूर फाट्यावर ट्रॅक्टरच्या मागच्या चाकावर आपटली. यात ट्रॅक्टर चालक कमलेश लांजेवार (वय ३२) यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. या घटनेत सायकलस्वार राजेश बर्वे गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी भंडारा येथे पाठविण्यात आले. पुढील तपास साकोली पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुनील विके करीत आहेत.