माऊलींच्या समाधीवर श्रीराम नवमी निमित्ताने शिंदेशाही उटी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर श्रीराम नवमी निमित्ताने डोक्यावर शिंदेशाही, अंगात भरजरी वस्त्र, कंबरेला आकर्षक पितांबर वस्त्र, आणि चेहऱ्यावर पिळदार मिशी असा मराठमोळा शिंदेशाही अवतार अर्थात मराठा साम्राज्याचे महान योध्दा महादजी शिंदे यांचे रुप साकरण्यात आले.

          संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने परंपरेनुसार चालत आलेली प्रथा जपली जात आहे. पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे व सहकारी यांनी ही शिंदेशाही उटी साकारण्यात आली असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

        बीबीरामनवमीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पवमान अभिषेक व पुजा झाल्यानंतर दुपारी १२ वाजता प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोझे सरकार यांच्या माध्यमातून हभप डॉ.नारायण महाराज जाधव यांचे प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सवाचे किर्तन सेवा संपन्न झाली.

         तदनंतर प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप व पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांच्या उपस्थितीत राम जन्माचा पाळणा व आरती झाली. यावेळी उपस्थित मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. मंदिराशेजारील आवेकर भावे संस्थानच्या रामचंद्र पालखीचे आगमन व पुजन झाले. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर भाविकांसाठी शिंदेशाही उटी दर्शन पंखा मंडपातून सुरु झाले, रात्री आरती झाल्यावर मानकरी साहील कुऱ्हाडे यांच्या वतीने कलींगड प्रसाद भाविकांसाठी वाटप करण्यात आले. आळंदी व परीसरात विविध ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा केला करण्यात आला. श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने आळंदीत भव्यदिव्य श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रा काढण्यात आली.