राष्ट्रसंतांचे कार्य समाजाला आणि विशेषता तरुण पिढीला मार्गदर्शक ठरले :- डॉ.सुनील वाघमारे

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : आपल्या जीवन यात्रेतून त्यांनी राष्ट्र, स्वातंत्र्यप्राप्ती व राष्ट्रीय एकात्मतेसाठी आदर्श जीवन जगतांना सदाचारातून सुखाकडे, श्रमातून आनंदाकडे, देशभक्ती तुन राष्ट्रहिताकडे, शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मार्ग प्रशस्त केला. राष्ट्रसंतांचे हे कार्य समाजाला आणि विशेषता तरुण पिढीला मार्गदर्शक ठरले आहे असे मत इंद्रायणी सेवा फौंडेशनचे सचिव डॉ.सुनील वाघमारे यांनी व्यक्त केले.

           अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच पुणे यांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे सचिव डॉ.सुनील वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, शाहु महाराज पाटील, सुनील सानप, सचिन हिंगणकर, रामराम सानप, हरीष साळेगावकर, शालीग्राम बंड, विठ्ठल शिंदे, जनार्दन पितळे, अरुण बडगुजर, शिरीषकुमार कारेकर यावेळी उपस्थित होते.

          खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता असे मत डॉ.सुनील वाघमारे यांनी सांगितले.

         सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. असे गौरवोद्गार पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी व्यक्त केले.