दहा दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास पुणे-आळंदी रोडवर रास्तारोको…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आळंदीत आणि नदी पलीकडे पाण्यांसाठी नागरिकांना रात्रीस खेळ चाले याप्रमाणे पाण्यासाठी जागावे लागत आहे, शहरातील काही भागात रात्री अपरात्री पाणीपुरवठा केला जातो तोपण कमी दाबाने यामुळे नदी पलीकडील प्रभाग क्रमांक ९ मधील माजी नगरसेविका शैला तापकीर यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत येत्या दहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास पुणे-आळंदी रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

       याबाबत त्यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, शहरप्रमुख अविनाश तापकीर, रामदास दाभाडे तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील महीला भगीणी बहुसंख्येने उपस्थित होते.

नदीपलीकडील काळेवाडी गावठाण पाण्याची पाईपलाईन टाकून एक वर्ष झाले तरी ती जोडली जात नसून याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे माजी नगरसेविका शैला तापकीर यांनी सांगितले आहे. तसेच पद्मावती रोडवरील नागरिक सुध्दा पाण्याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले की लवकरात लवकर सदर मुलभूत प्रश्न जातीने लक्ष घालून सोडवला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.