पोलिस पाटलाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंधेला निळा झेंडा फेकून दिल्याचा आरोप… — वरिष्ठांकडे तक्रार..

 

युवराज डोंगरे/खल्लार

       भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्वसंधेला दर्यापूर तालुक्यातील पाथरविरा येथील पोलिस पाटलांनी गावातील पोलवर लावलेला निळा झेंडा रात्रीच्या सुमारास फेकून दिला असल्याचा आरोप गावातील 8 जणांनी केला असून त्याबाबतची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

      रोशन दुर्योधन रायबोले हे पाथरविरा येथील पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पाथरविरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्य गावात निळे झेंडे व तोरण गावातील बौध्द बांधवांनी लावले होते. 

        गावातील बजरंगबलीच्या मंदिराजवळ असलेल्या पोलवर निळे झेंडे लावले होते. हे झेंडे गावचे पोलिस पाटील रोशन रायबोले यांनी पोलवर चढून खाली फेकून दिले असा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. गावचे पोलिस पाटील हे गावातील बौध्द बांधवांनी आयोजित केलेल्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होत नाही यावरुन ते जातीयवादी असल्याचाही आरोप केला आहे.

        निळे झेंडे पोलवरुन खाली फेकून दिल्याबाबतची तक्रार गावातीलच गजानन प्रल्हाद रायबोले, दिनेश मधुकर रायबोले, गजानन कैलास रायबोले, राहुल पूर्णाजी रायबोले, आशिष नागोराव रायबोले, विकल जिवन रायबोले, प्रफुल रायबोले, विजय रायबोले यांनी लेखी तक्रारीद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षक अमरावती, उपविभागीय पोलिस अधिकारी,दर्यापूर, ठाणेदार येवदा यांच्याकडे केली आहे

कोट:-यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने पाथरविरा गावाचे पोलिस पाटील रोशन रायबोले यांच्याशी संपर्क साधला असता गावातील काही लोक हे माझ्याकडे मिरवणूकिची परवानगी मागण्यासाठी आले होते.

         मात्र परवानगी देने हे माझे काम नसून ते पोलिस स्टेशनचे काम आहे.गावात शांतता राहावी हा माझा प्रयत्न असतो मात्र माझ्यावर लावलेला आरोप हा खोटा असल्याचे सांगितले.