खंडेरायाच्या जेजुरी नगरीत भंडार-खोबऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचे आगमन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

जेजुरी ; येळकोट येळकोट जय मल्हार’,’ माऊली माऊली’ अशा जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, भंडार-खोबऱ्याची उधळण करत आज (दि. १६) सायंकाळी ५ वाजता श्री खंडेरायाच्या जेजुरी नगरीच्या वेशीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो वारकरी मल्हारीरायाच्या पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. शैव-वैष्णवांचा अनोखा संगम यानिमित्ताने अनुभवण्यास मिळाला.

    दोन दिवस सासवडच्या पालखी तळावर मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पादुकांना पहाटे अभिषेक, धुपारती झाल्यानंतर सोहळा सकाळीच जेजुरीकडे मार्गस्थ झाला. बोरवके मळा येथे सकाळची न्याहरी झाली. तसेच यमाई शिवरी येथे विश्रांती झाली. सोहळ्याच्या वतीने यावेळी श्री यमाई मातेची पूजा करण्यात आली. त्यानंतर वाटचालीत साकुर्डे फाटा येथे थोडा वेळ विश्रांती झाली.

    रणरणत्या उन्हात वाटचाल करत सायंकाळी ५ वाजता सोहळा जेजुरीच्या वेशीवर पोहोचला. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे आदिंनी सोहळ्याचे स्वागत केले. जेजुरीकरांनी यावेळी माऊलींच्या पालखीवर मुक्त हस्ताने भंडाऱ्याची उधळण केली.

     ‘हरी-हर भेद नका करू’ असे सांगत सर्वच वारकरी संतांनी शैव-वैष्णव ऐक्याचा पुरस्कार केला. त्यासंबंधी साहित्य रचनाही केल्या. त्यापैकी ‘अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी॥’ हा संत एकनाथांचा अभंग गात वारकऱ्यांनीही भंडाऱ्याची उधळण केली. अनेक दिंड्यांमधून वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात नाथबाबांची भारूडे, पदे, गौळणी म्हणण्यात दंग झाले होते. तसेच महिला वारकरी खंडोबाची पारंपारीक गीतेही गात होत्या.

      पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आपले कुलदैवत असणाऱ्या मल्हारीरायाच्या दर्शनासाठी गडावर दर्शनासाठी गर्दी केली होती. मार्तंड देव संस्थानाच्या वतीने पालखी मार्गावरील मुख्य शिवाजी चौकात मोठ्या स्क्रीनवर खंडोबारायाच्या गाभाऱ्यातील दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. देवाच्या प्रसाद वाटप ही करण्यात येत होते.