रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने मूल तालुक्यातील विविध गावांमध्ये “संघटना आपल्या दारी” हा उपक्रम राबविला जात आहे, यादरम्यान संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्या गावातील नागरिकांना एकत्र करून गावातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी काही मदत करता येईल का याबाबत मार्गदर्शन करतात व ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्यातील तरतुदी याबाबत जनतेला प्रबोधन करतात.
सोमवार दिनांक १३मे २०२५रोजी मूल तालुक्यातील मौजा मोरवाही येथे हनुमान मंदीरात या उपक्रमाअंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा व्यासपीठावर जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर मोरवाही येथील एकनाथ पाटील शेंद्रे अध्यक्षस्थानी होते, रमेश डांगरे सचिव, डॉ.आनंदराव कुळे, आणि मूल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लहुजी कडस्कर चिखली हे अतिथी म्हणून उपस्थित होते.
ग्रामस्थांना गावातील समस्यांबाबत विचारणा केली असता गोसेखुर्द धरणातून सिंचनासाठी सोडण्यातयेणाऱ्या पाण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे आणि कंत्राटदार मनमानी पद्धतीने ते काम करीत आहे, कुठलेही नियोजन नाही की पाइपलाइन साठी खोदलेल्या नाल्या पुर्ववत बूजवून जागा समतल करुन दिली जात नाही अशा आशयाच्या तक्रारी उपस्थित प्रत्येकाने केल्या, याशिवाय गावांतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर पाट्या टाकताना रस्त्यावरचे पाणी नालीतून वाहून जाण्यासाठी योग्य तरतुद न करता नाल्यांवर रस्त्यापेक्षा उंच पाट्या टाकल्या जात असल्याचीही समस्या यानिमित्ताने पुढे आली.
गावातील मोरवाही माल व मोरवाही चक शिव धुऱ्यावरुन पांदन रस्त्याचे रखडलेले काम गावात भांडणाचे मुळ ठरत असल्याने ह्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी पुढे आली.
उमा नदीवरील पाणीपुरवठा योजना पूर्ण करुन पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी पुढे आली.
शासकीय योजनांची माहिती संबंधित अधिकारी यांचे कडून वेळेवर मिळत नसल्यामुळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याची तक्रार समोर आली आणि यासोबतच पिक विमा आणि नुकसान भरपाई देताना ज्यांच्या शेताचे नुकसान झाले ते सोडून इतरांनाच लाभ मिळाल्याचा ही समस्यांमध्ये उल्लेख केला गेला आहे.
याशिवाय म्हसबोळण तलावाच्या पाण्याच्या नहराची कित्येक वर्षांपासून दुरुस्ती नाही की मायनर ची दुरुस्ती नाही त्यामुळे हंगामात शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असल्याचीही समस्या यानिमित्ताने पुढे आली.
चितेगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाची समस्या आणि वाघांची दहशत शेती कसतांना मोठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
जवळपास ८००-९०० लोकसंख्येच्या या गावात जाण्यासाठी मागील दोन वर्षापासून उमा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याने सोय झाली असली तरी जंगलालगतच्या या गावात इतरही बऱ्याच समस्या असल्याचे उपस्थित ग्रामस्थांशी मुक्त चर्चा करताना लक्षात आले.
त्यामध्ये मूलच्या आठवडी बाजारात बैलगाडी नेण्याची समस्या, बाजार समितीत धान्य विक्रीसाठी नेल्यानंतर लिलावासाठी होणारा उशीर , चुकारा वेळेत न मिळणे , वगैरे समस्या पुढे ठेवल्या होत्या.
याप्रसंगी बोलतांना लहूजी कडस्कर यांनी नागरिकांना बऱ्याच समस्या आहेत मात्र आपण जागृत राहून आपला हक्क आणि अधिकार यांची माहिती घेऊन आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याबाबत तक्रार करायला पुढे आले पाहिजे,आपली अडचण, समस्या बोलून दाखविली पाहिजे असे मत व्यक्त केले.दीपक देशपांडे यांनी ग्राहक संरक्षण कायदा, आपले अधिकार आणि त्या अधिकाराबाबत आपले अज्ञान त्यामुळे होत असलेली फसवणूक याबाबत सविस्तर माहिती देताना आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना पावती मागण्याची सवय लावावी आणि होत असलेल्या अन्यायाचा विरोध करीत त्याविरोधात वेळीच योग्य पद्धतीने तक्रार दाखल करावी व एकट्याने लढण्याऐवजी एकत्रित लढा देण्याची व संघटित होण्याची आवश्यकता आहे असे उपस्थितांना आवाहन केले तसेच जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या कार्याची माहिती देताना आमचे कार्य हे समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत त्यांना स्वयंनिर्भर करणे हेच असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आनंदराव कुळे यांनी तर प्रास्ताविक रमेश डांगरे सचिव यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकनाथ शेंद्रे,बाळू वाकुडकर,हरीदास पाल,श्रावण गेडाम, किशोर झरकर,वेणुदास झरकर यांनी प्रयत्न केले,या कार्यक्रमाला महिला व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.



