सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये… — चंद्रपूर पोलिसांची करडी नजर…

     उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती 

        सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षातील उमेदवार उभे असून प्रचार सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (ट्विटर) इत्यादी समाज माध्यमावर विविध प्रकारचे ऑडीओ/व्हिडीओ व इतर संदेश टाकण्यात येतात. तसेच अशा पोस्टवर इतर लोक लाईक व कॉमेन्टस् करून शेअर करतात. परंतु असे निदर्शनास आले आहे की, खोटया बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ/व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर वायरल होत आहे.

        तसेच काही इसम व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने विरोधी उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटुंबियांना लक्ष केंद्रित करून द्विअर्थी आक्षेपार्ह पोस्ट टाकत आहेत व अशा पोस्टला इतर लोक लाईक व त्यावर आक्षेपार्ह कॉमेन्टस् करून शेअर करीत आहे. यावरून चंद्रपुरात नुकताच आदर्श आचारसंहिता दरम्यान समाज माध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधित इसमा विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आलेली आहे.

         तरी, आपण आपले व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (ट्विटर) व इतर सोशल मिडीयावर राजकीय पक्ष व उमेदवार बाबत वैयक्तिक व आक्षेपार्ह टिकाटिप्पणी तसेच धार्मिक भावना दुखविणा-या पोस्ट टाकू नये. कोणतेही व्हिडीओ, फोटो एडीट करून आक्षेपार्ह पोस्ट करु नये किंवा त्यास लाईक व कॉमेन्टस् करून अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करू नये. सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवण्यात यावे. अन्यथा संबंधितांविरुध्द कायद्यान्वये कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.

           अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ/ऑडीओ संदेश प्राप्त झाल्यास त्या-त्या समाज माध्यमावर रिपोर्ट करावे. किंवा त्याची माहिती त्वरीत नजीकच्या पोलिस स्टेशन किंवा सायबर पोलिस स्टेशन येथील 8888511911 या मोबाईल क्रमांकावर द्यावी. सोशल मिडीयावरील प्रत्येक पोस्ट वर चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचे बारकाईने लक्ष आहे, असे पोलिस दलाने माहिती कळविली आहे.