Home Social सेवा, संस्कार आणि समाजभानाचा वारसा; सर्जेराव घुंडरे पाटील यांचे जीवन आदर्शवत :...

सेवा, संस्कार आणि समाजभानाचा वारसा; सर्जेराव घुंडरे पाटील यांचे जीवन आदर्शवत : ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आळंदीचे माजी नगराध्यक्ष सर्जेराव घुंडरे पाटील यांचे जीवन सेवा, संस्कार आणि समाजभान यांचा आदर्श संगम असून त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीला दिशादर्शन मिळते, असे प्रतिपादन ह.भ.प.चैतन्य महाराज कबीर यांनी केले.

        माजी नगराध्यक्ष सर्जेराव घुंडरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान कीर्तनसेवेच्या वेळी ते बोलत होते. या सप्ताहाचे आयोजन ह.भ.प.संजय महाराज घुंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

       ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर म्हणाले, “सर्जेराव घुंडरे पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केवळ प्रशासकीय भूमिका निभावली नाही, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. लोकसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आजही तितकीच प्रभावी आहे.”

        या अखंड हरिनाम सप्ताहात हरिपाठ, भजन, प्रवचन व कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी ह.भ.प.पंडित महाराज घुंडरे, प्रमोद महाराज काळे, शंकर महाराज चिंचकर व उल्हास महाराज सूर्यवंशी यांनीही कीर्तन सेवा सादर केली. अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

         या भक्तीमय सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.