ज्या साधनाने संपत्ती निर्माण होते ती साधने आणि ती संपत्ती म्हणजेच साधन संपत्ती होय.
साधनांचे दोन प्रकार, 1 निर्जीव साधने उदा.जमीन माती डोंगर पर्वत,अग्नी,विद्युत,पाणी,गुरुत्वाकर्षण,हवा, वारा,आकाश पोकळी अवकाश.2 सजीव साधने म्हणजे माणूस आणि त्याचे बळ ( मनुष्यबळ ) , प्राणी आणि त्यांची ताकद,पक्षी आणि त्यांची ताकद,वनस्पती,झाडे झुडपे आणि त्यांची ताकद.
अशाप्रकारे निर्जीव आणि सजीव ही दोन साधने आणि त्यातील शक्ती आहेत,या दोन्हींच्या एकत्र येण्यातूनच नवीन पदार्थ वस्तू निर्माण होत असतात.वस्तूंचे उत्पादन होत असते,आज बाजारात जे जे काही मिळते,ते सर्व निर्जीव आणि सजीव ताकद ऊर्जा शक्ती एकत्र येण्याने निर्माण झाल्या आहेत.छोटी मोठी धरणे,कारखाने , रेल्वे,बसेस,दुचाकी,चारचाकी, पेट्रोल डिझेल,विद्युत,लहान मोठ्या इमारती,कार्यालये,घरे,स्मारके ,कारखाने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू,शेती आणि तिच्यातून होणारी सर्व उत्पादने या सर्व गोष्टी निर्जीव शक्ती आणि सजीव शक्ती एकत्र येण्यामुळे निर्माण झालेल्या आहेत.या सर्व साधनात आणि प्रक्रियेत मानवी मनुष्यबळ हे केंद्रस्थानी आहे.कारण मानवी बुद्धी आणि श्रम एकत्र येण्याने हे भौतिक आणि मानसिक जग निर्माण झाले आहे.हे सर्वांना आधी मान्यच करावे लागते.
निसर्गनिर्मित साधने म्हणजे पंचमहाभूते होत,किंवा पंचमहाभूते म्हणजेच निसर्ग होय,पाच महाभूते म्हणजे ( भूत याचा अर्थ प्रकृती ). पृथ्वी ( माती ), आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायु म्हणजे हवा वारा,आकाश म्हणजे अवकाश पोकळी.ही ती पंचमहाभूते म्हणजेच निसर्ग होय.नदी डोंगर पर्वत वृक्ष हे यांचे पासूनच बनलेली आहेत.
धरणे,विद्युत्,खाणी ( कोळसा,सोने, कॉपर,लोखंड इत्यादी ,) ही जमिनीतील संपती,छोटी मोठी कारखाने ,आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू,तसेच शेती आणि तिच्यातून निर्माण होणाऱ्या वस्तू कुणी निर्माण केल्या,तर मालक आणि श्रमिकांनी,मालकाची बुद्धी आणि स्थानिकांचे हात यातून म्हणजे बुद्धी आणि श्रम या दोन शक्तीतून निसर्गसाधनांच्या वापराने हे जग निर्माण झाले,तसेच कर्मचारी नोकरवर्ग ( सांगकाम्या ) यांच्यामुळे भौतिक जग निर्माण झाले.
याचा अर्थ हे भौतिक जग निर्माण होण्यास म्हणजेच पृथ्वीवरील दिसणाऱ्या सर्वच गोष्टी निर्माण होण्यात निसर्गसाधन,मालकाची बुद्धी आणि स्थानिकांचे हात ( शक्ती ) या तीन फॅक्टर कारणीभूत आहेत.हे तिघे एकत्र नाही आले तर कोणत्याच वस्तू निर्माण होणार नाहीत.म्हणजेच बुद्धी श्रम सेवा या तीन गोष्टीतून सारेकाही निर्माण झाले असेल तर मग यावर हक्क आणि अधिकार समान असला पाहिजे,तो नाही.असे का ? हा मुख्य प्रश्न आहे.मालक श्रमिक कर्मचारी ( नोकर ) यांची समान मालकी हक्क अधिकार का नको ? मुख्य हा प्रश्न आहे,आणि या समस्यांचा च विचार होणे गरजेचे आहे.यावर जे विचारवंत विचार करताहेत,ते या समतेसाठी समानतेसाठीच लढाई करताहेत.यासच शोषणाविरुद्धचा लढा लढाई असे म्हणतात.कारण श्रमिकांच्या श्रमाचे शोषण मालक करतो,त्यांचा हक्क अधिकार त्यांना देत नाही.तसेच मध्यमवर्गीय म्हणजे नोकर सेवक यांचे पण आर्थिक शोषण हे मालकवर्ग करतो,( खरे तर मालक वर्ग बुद्धीचा पण वापर करीत नाहीत,बुद्धी ही मॅनेजर ची असते,मालकाचा फक्त पैसा असतो,तोही ग्राहकांचे शोषण करून,महागाई काळाबाजार साठेबाजी करून मिळवलेला पैसा आणि संपती असते ).
म्हणून श्रमिक आणि मालकांची ही लढाई म्हणजे श्रमाची चोरी मालकाने केल्यामुळे आणि त्याचा समान हिस्सा त्याला न मिळाल्यामुळे श्रमिक आणि कर्मचारी हे आपापल्या संघटना स्थापन करून ,म्हणजे ताकद निर्माण करून आपला हक्क अधिकार मागत असतात.त्यासाठी ते रस्त्यावरची लढाई करतात.म्हणजे उपोषण धरणे मोर्चे असे आंदोलने करतात.खरेतर श्रमिक आणि कर्मचाऱ्याची लढाई न्याय्य लढाई होय.आणि मालक ( जमीनदार भांडवलदार,कंपनीमालक ) हे संघटित होऊन लढतात,ती यांची लढाई ही अन्याय ची असते.कारण सनदशीर लढाई करणाऱ्या श्रमिकांना कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारे त्रास देणे,त्यांचे संप यशस्वी न होऊ देण्यासाठी मालक वर्ग कायद्याचा आणि सरकारचा आधार मदत घेतात,सरकार आणि धार्मिक महाराज पण या मालक वर्गास मदत करीत असतात.
खरे तर माझ्या मते,ही मालक आणि श्रमिक यांच्यातील ही लढाई नसून दोन मालकांची ही लढाई आहे,न्याय अन्याय यांच्यातील ही लढाई आहे.सत्य असत्य यांची ही लढाई आहे,श्रम आणि सेवा चोरी करणाऱ्या मालकाविरुद्ध दुसऱ्या मालकाची लढाई आहे.
जमीन,पाणी ,आकाश,नद्या,डोंगर पर्वत जमिनीतील सोने अर्भक लोखंड इत्यादी धातू या कुण्या एका मालकाच्या नाहीत.यावर या धर्तीवर राहणाऱ्या सर्वच सजीवांचा सारखाच अधिकार आहे.हे भौतिक जग निर्मितीत साऱ्याच माणसाचे श्रम बुद्धी सेवा कारणी लागलेली आहे.म्हणून या भौतिकजागाचा मालक एकटा नसून सारेच मानव आहेत.मालक एक आहे,असे असताना दोन किंवा काही मूठभर मालक कसे निर्माण झाले ? तर एकाने दुसऱ्याचे शोषण केले,पिळवणूक केली,अन्याय केला,अत्याचार केला,कुबुद्दीचा वापर केला,स्वार्थीबुद्दीचा वापर केला,म्हणून असे घडले,विषमता निर्माण झाली.आर्थिक सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात विषमता निर्माण झाली.
भौतिकजग निर्माण करण्यात प्रत्येक माणसाचा समान प्रयत्न असताना ही विषमता दुष्ट स्वार्थी लोभी मूठभर माणसांनी निर्माण करून देशाच्या 75 टक्के नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीवर आपली मालकी प्रस्थापित केली.म्हणूनच ढोबळ मानाने आज 40 टक्के दारिद्र्य रेषेखाली आहेत.30 टक्के गरीब आहेत,20 टक्के मध्यम आणि 10 टक्के श्रीमंत अशी आर्थिक विषमतेने ग्रस्त भारतीय जनता आहे.
या विषमतेचे कारण म्हणजे मालकी हक्क कुणाचा ? या प्रश्नात दडलेले आहे.नैसर्गिक साधने संपती कुणाची ? गरिबांची ,मध्यम वर्गाची,की श्रीमंतांची ? की सर्वांचीच ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे,तसेच मनुष्य निर्मित साधने म्हणजे शेती कारखाने कंपन्या यांचे मालक कोण ? आणि तेच का ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.खानवर अधिकार कुणाचा ? यावर विचार झाला पाहिजे.
विचारांती समजेल की,नैसर्गिक आणि मानवनिर्मित सर्व साधन समाप्तीत या देशात राहणाऱ्या प्रत्येकाचाच अधिकार आहे.कारण या देशाचा नागरिक मतदार हा सार्वभौम आहे.म्हणजे राजा आहे.आणि मतदानाचा अधिकार साऱ्यांनाच आहे.म्हणून या देशाचा राजा हा मतदार असेल तर या देशावर राज्य सत्ता त्याचीच आहे.म्हणजे सारेच मतदार हे या देशातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित साधने आणि संपत्तीचे मालक सारेच आहेत.कुणीही एक किंवा समूह नाही.आम्हीच आमचे मालक आणि आम्हीच आमचे सेवक.हा समता समानतेचा अर्थ आहे.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 9 जानेवारी 2026, फोन : 9420912209.


