गेल्या 80 वर्षात आजपर्यंत एकूण चार वेळेस अमेरिका आणि रशिया ज्यांच्याकडे सर्वात जास्त अणुबॉम्ब आहेत , त्यांचीच एकमेकांवर अणुबॉम्बची ताकद दाखवण्याची खुमखूमी आणि परिणामी जगाला नष्ट करण्याची भीती निर्माण झाली होती.
त्या चारपैकी निदान एक तरी अनुभव सांगणे आवश्यक आहे. जेंव्हा सुरुवातीला अमेरिका आणि रशिया यांच्याकडे सर्वात जास्त अणुबॉम्ब होते. यापैकी अमेरिकेकडे ते अणुबॉम्ब 4000 मैलावर असलेल्या रशियावर टाकण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्र होती. परंतू , रशियाकडे त्यांचे अणुबॉम्ब अमेरिकेवर प्रतिहल्ला करण्यासाठी एवढ्या लांबची क्षेपणास्त्रे नव्हती. केवळ 250 मैलापर्यंतचीच क्षमता असलेली होती. त्यामुळे रशिया नेहमी चिंतेत असायचा.
अशातच अमेरिकेच्या जवळ असलेला देश म्हणजे *क्यूबा* ज्याचे अंतर अमेरिकेपासून केवळ 90 मैल एवढेच होते. परंतू या देशावर अमेरिकेचा कट्टर शत्रू असलेला *फिडल कॅस्ट्रो* ची अनियंत्रीत सत्ता होती. शत्रूचा शत्रू आपला मित्र समजून रशियाने त्याच्याशी मैत्री केली. रशियाने मग आपली क्षेपणास्त्रे आणि अणुबॉम्ब समुद्रमार्गे क्यूबात नेऊन लपवून ठेवली. तेंव्हा रशिया बिनधास्त झाला.
जेंव्हा ही गुप्तता अमेरिकेला समजली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी आपल्या गुप्तहेरामार्फत खात्री करून घेतली. तेंव्हा अमेरिकेचे धाबे दणाणले. तेंव्हापासून अमेरिका आणि रशियात युद्धाच्या शक्यतेची टांगती तलवार निर्माण झाली. म्हणून अमेरिकेने क्यूबाच्या समुद्री सीमेत कोणतेही जहाज अमेरिकेच्या तपासणीशिवाय येणार नाही अशी कार्यवाही चालू केली.
जेंव्हा 1962 मध्ये रशियाच्या तीन अन्वस्त्रसज्ज पाणबूड्या क्यूबाच्या दिशेने येत असलेल्या जेंव्हा अमेरिकेने पहिल्यांदा पाहिल्या. तेंव्हा अमेरिकेने त्यांना परत जाण्याचा इशारा रशियाला दिला. नाहीतर आम्ही त्या उडवून टाकू अशी अमेरिकेने धमकी सुद्धा रशियाला दिली.
तेव्हा रशियाने आपल्या तिन्ही पाणबूड्यांना समुद्राच्या तळाशी जाण्याचा सल्ला दिला. परंतू , कांही तांत्रिक अडचणीमुळे हा संदेश दोन तीन पाणबुड्यापर्यंत पोहचला. मात्र एका तिसऱ्या पाणबुडीपर्यंत मात्र पोहचू शकला नाही. रशियाने मात्र आपल्या तिन्ही नौदल अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले होते की , प्रत्येक पाणबुडीवर प्रमुख तीन नौदल अधिकारी असतील आणि त्या तिघांचेही एकमत झाल्याशिवाय अणूहल्ला अमेरिकेवर करायचा नाही, असा तो आदेश होता.
परंतू या तिन्ही पाणबुडीपैकी एका पाणबूडीला समुद्राच्या तळाशी जाण्याचा आपल्या रशियाचा आदेश काही तांत्रिक बिघडामुळे संपर्क तुटल्याने मिळाला नाही. म्हणून त्या पाणबुडीवरील नौदल अधिकाऱ्यांची अशी समजूत झाली की आता रशिया अमेरिकेचे अणूयुद्ध सुरु झालेले आहे. म्हणूनच रशियाशी आणि इतर दोन पाणबुडीशी संपर्क तुटलेला आहे. म्हणून आता आपण अमेरिकेवर अणूहल्ला करूया याविषयी त्या तीन प्रमुख नौदल अधिकाऱ्यात चर्चा झाली. तीनपैकी दोन अधिकाऱ्यात अणूहल्ला अमेरिकेवर करण्याचे एकमत झाले. परंतू , जो तिसरा अधिकारी आफिपॉप होता त्याने मात्र असहमती दर्शवली. त्याचे म्हणणे हे होते की आपण थोडीशी वाट पाहुन मग निर्णय घेऊ. कांही वेळानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटातच पुन्हा तुटलेला संपर्क रशिया व इतर दोन पाणबुडीशी झाला आणि *तो अणूहल्ला* टळला…….!
जर त्या तिसऱ्या अधिकाऱ्याने अणूहल्ल्याला सहमतीच दर्शवली असती………
तर कदाचित 1962 मध्येच रशिया आणि अमेरिकेत तिसरे आणि अंतिम जागतिक अणू महायुद्ध होऊन जग नष्टही झाले असते……!
अशा एकूण गेल्या 80 वर्षात केवळ रशिया आणि अमेरिका यांच्यात चार वेळेस अणूहल्ल्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. ज्या केवळ पाच ते सातच मिनिटात संभ्रम दूर झाल्याने टळल्या. नाहीतर दोन्ही देशातील ही खुमखूमी आजही 2026 पर्यंत टिकून आहे…..!
ही खुमखूमी पुन्हा बाहेर उफाळून येऊन जगाला नष्ट करते की काय अशी भीती पुन्हा निर्माण झाली आहे.


