Home देशविदेश वंशाचा दिवा आणि बंदिस्त स्त्री…

वंशाचा दिवा आणि बंदिस्त स्त्री…

   स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असणे हे नैसर्गिक आहे.आकर्षणात गुरुत्वाकर्षणाचा गुणधर्म आहे,नियम आहे.विजातीय आकर्षण हा निसर्गनियम आहे. स्त्री आणि पुरुष एकजातीय नसून विजातीय आहेत,म्हणून त्यांच्यात आकर्षणाचे तत्व समाविष्ट आहे. स्त्री ही एक जात आहे आणि पुरुष ही दुसरी जात आहे.मानवप्राण्याच्या या दोन जाती आहेत,स्त्री आणि पुरुष.या पेक्षा मानवी समूहात जैविक जात तिसरी नाहीच.सामाजिक क्षेत्रात अनेक ज्या जाती केल्या गेल्या त्या त्यांच्या व्यवसायानुसार केल्या गेल्या.त्यांच्यात रोटी बंदी आणि बेटी बंदीचा कायदा करण्यात आला,म्हणून हजारो जातीचा कप्पेबंद मानवी समाज निर्माण झाला.या जातिव्यवस्थे ची समाजव्यवस्था म्हणतात.

    वंशाला दिवा पाहिजे,हा विचार का बळावला ? याचे कारण कुटुंब व्यवस्था होय.कुटुंबव्यवस्था साठी विवाह किंवा लग्न ही संकल्पना पुढे आली.मग लग्न कुणाशी तर आपल्याच वंशाच्या लोकांशी म्हणजे जातीशी,एक जात म्हणजे एक वंश च होय.आज आडनाव हा एक वंश असला तरी,अनेक आडनावे ही एकाच जातीची आहेत,याचा अर्थ त्या जातीचा वंश एकच आहे.एक रक्तगट म्हणजे एक वंश. एकाच रक्तगटाची अनेक आडनावे,जाती आहेत.खरेतर सायन्स असे सांगते की, एकाच रक्तगटापासून निर्माण झालेली संतती ही सुदृढ सशक्त नसते,ती विशुद्ध असते,त्यात अनेक दोष असतात.( गुणात्मक दोष ). असे असले तरी आम्हाला आमच्याच जातीचा,कुटुंबाचा वंश हवा असतो,हे एक प्रकारचे अद न्यानच म्हटले पाहिजे.असो.ही झाली शास्त्रीय चर्चा.

     आता वंशाच्या दिव्याच्या आग्रह का? तर याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या कुटुंबाला इतरकुटुंबाचे नाव लागू नये.आपला वारसदार हा आपल्या पासूनच निर्माण झालेला हवा,हा आग्रह.आणि समज,आणि या समजला मान्यता.

    आपल्या कुटुंबाचा वंशज आपलाच हवा,याची खात्री होण्यासाठी मग स्त्रीपुरूष यांनी एकमेकांच्या बंधनात असणे जरूरी आहे,असे बंधनात राहायचे तर त्यावर उपाय म्हणजे लग्न करणे.लग्न म्हणजे लगन.संलग्न,एकत्र राहणे.एकमेकाशी एकनिष्ठ राहणे,बाहेरख्यालीपणा न करणे.एकमेकाशी बांधून घेणे.बंदिस्त होणे,बंदिस्त जीवन जगणे.कुटुंबात स्वातंत्र्य नसणे. पारतंत्र्यात जीवन जगणे.परावलंबी जीवन जगणे,परस्परांवर अवलंबून असणे,आपली शारीरिक मानसिक गरज ही फक्त एकाच व्यक्तिपासून मिळविणे, ती पूर्ण नाही होऊ शकली, तरी नाईलाज म्हणून,दैव म्हणून,सामाजिक बंधन म्हणून,पावित्र्य जपणे म्हणून गुपचुप सहन करणे.यातूनच पावित्र्याची संकल्पना, पतिव्रता , सती,आणि सतीची परंपरा रूढ झाली.यातून पुरुषसत्ताक कुटुंब पद्धत असल्यामुळे पुरुषास सूट मिळाली,परंतु पवित्र्याच्या या बंधनात स्त्री मात्र अडकून पडली.

माझ्या पासून झालेले मूल हे माझेच आहे,हे सिद्ध करणे म्हणजे वंशाचा दिवा होय.आणि हा दिवा माझाच आहे,यासाठी विवाहाची तरतूद,परंपरा ,नियम ,कायदा निर्माण झाला.वंशाचा दिव्याच्या नियमाचे काटेकोर पालन करणे हे आद्यकर्तव्य स्त्रीचेच ठरविण्यात आले.ते कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या कर्तव्यास पावित्र्याचे बंधन स्त्रीवरच टाकण्यात,लादण्यात आले.आपण ज्याच्याशी लग्न केलंय त्या पुरुषाशिवाय अन्य पुरुषाशी संबंध ठेवला तर त्यापासून झालेले मूल हे आपल्या वंशाचा दिवा होऊ शकत नाही,अशी एक समाज मान्यता रुढ झाली.( दत्तक पुत्र चालते ही त्यास पळवाट पण काढली ) दत्तक पुत्र हा तर दुसऱ्याचे मुल असते,हे चालते,मग आपल्या स्त्रीच्या गर्भात दुसऱ्याचे मुल चालत नाही,हा दुटप्पीपणा पुरुष वर्गाने स्त्रीवर लादला,आणि तिला बंदिस्त केले.” माझ्या शरीरावर माझा हक्क असला पाहिजे,या ऐवजी माझ्या शरीरावर विवाहाचे बंधनाने एखाद्या पुरुषाचा हक्क प्रस्थापित होणे,इथेच स्त्रीने आपले स्वातंत्र्य गमावले.

   खरे तर कुटुंब,म्हणजेच दोन विरुद्ध लिंगी व्यक्ती म्हणजे स्त्रीपुरूष हे विवाहबद्ध होऊन सहयोगी म्हणून एकत्र राहणे, मुले आईवडील यांची काळजी घेणे,त्यांचे भरणपोषण,संरक्षण करणे हे मुख्य कर्तव्य दोघांचेही असते,याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही,परंतु केवळ लग्न केले म्हणून स्त्रीवर पावित्र्याचे बंधन,नैतिकतेचे बंधन टाकणं म्हणजे तिचे किंवा त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य हिरावून घेणे होय,बंधन म्हणजे गुलामीच होय.ही गुलामी केवळ वंशाच्या दिव्याच्या चुकीच्या संकल्प ने मुळे,चुकीच्या विचारामुळे आणि मालकी हक्काच्या विचारामुळे आली.

   आजही स्त्री नवऱ्याला मालक म्हणते,आणि नवरा बायकोला मालकीण म्हणून संबोधतो,नव्हे ही मान्यताच आहे.ही मान्यता म्हणजेच मालक गुलामाची व्यवस्था मान्य करणे होय.स्वातंत्र्य त्यालाच म्हणतात,ज्यात कुणी कुणाचा मालक नसतो आणि कुणी कुणाचा गुलाम नसतो.

       विवाह ,लग्न ही व्यवस्था एकत्र राहणे,सहजीवन जगणे,एकमेकांची सुखदुःखे सांभाळणे,मुलांचे भविष्य घडविणे,मालमत्ता सुरक्षित ठेवणे इत्यादी साठी ठीक आहे,परंतु विवाहामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर स्वतःच्या शरीरावर ,मनावर जर कुटुंबातील लोकांचा दबाव असणार असेल,आणि पवित्र्याच्या , देवाच्या,धर्माच्या नावाखाली नवरा किंवा बायको दबून जात असतील,गुदमरून मरनार असतील,तर अशा जीवनपद्धती ला अर्थ काय ? अशी जीवनपद्धत निरर्थक,अयोग्य, अन्यायीच म्हटली पाहिजे.

     जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे विचार सुचले,कदाचित रूढीप्रिय विचारवंतांना वाचकाना हे रुचणार नाहीत, पचनार तर नक्कीच नाहीत,हे माहीत असूनही आपण या विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि 21 व्या प्रगत जगात वावरताना हे विद्रोही विचार म्हणून यावर विचार व्हावा, एव्हढीच अपेक्षा,या विचारामुळे स्त्रीमुक्ती होईल असा भाबडा विचार.

              लेखक

             दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : आठ मार्च 2026, जागतिक महिला दिन, फोन : 94 20912209