अलंकापुरीत श्री पांडुरंगराया व माऊलींची भेट सोहळा संपन्न… 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : विठ्ठलाच्या भेटीसाठी त्याचे भक्त नेहमीच पंढरपूरला जातात. मात्र, श्री पांडुरंगही भक्तांच्या भेटीला येतो. हा सोहळा साजरा करण्यासाठी पंढरपूरहून पायी निघालेला श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत मार्गस्थ होणार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन सोहळ्यासाठी पांडुरंगाची पालखीचे अलंकापुरी नगरीत हरीनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

        यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज व श्री भगवान पांडुरंगाची भेट संपन्न झाली. यावेळी विश्वस्त हभप योगी निरंजननाथजी, ॲड.राजेंद्र उमाप यांनी पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत केले तसेच आळंदी ग्रामस्थांच्या वतीने हभप चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा व हभप संजय महाराज घुंडरे पाटील यांनी पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, विठ्ठल महाराज वासकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार तसेच मानकरी व मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

         सोमवारी श्री खंडुजीबाबा मंदिरात पालखीचा मुक्काम करुन, तर मंगळवारी, ५ डिसेंबरला संगमवाडी येथे सकाळचा विसावा घेऊन पालखी आळंदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता आळंदीत पालखीचे अलंकापुरी नगरीत आगमन झाले. या पालखी सोहळ्यामध्ये १५ हजार वारकरी भाविकांचा सहभाग आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीकडून या पालखी सोहळ्याचे गेल्या सहा वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे. येत्या १२ डिसेंबर पर्यंत वासकर फड इंद्रायणी तीरी श्री पांडुरंगाच्या पालखीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.