सत्कार ही कलावंताची ऊर्जा :- पद्मश्री डाॕ.परशुराम खुणे

 

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

 देसाईगंज-

    मला मिळालेलेल्या पद्मश्री पुरस्काराच्या रुपाने झाडीपट्टी रंगभूमीची दखल घेतली गेली असून झाड्डीपट्टी रंगभूमीवर उत्तरोत्तर चांगले कलावंत निर्माण होण्यासाठी, त्यांच्या चांगल्या कार्याचा, गुणाचा, कलेचा सत्कार केला पाहीजे कारण सत्कार ही कलावंताची ऊर्जा आहे, असे मत पद्मश्री डाॕ. परशुराम खुणे यांनी देसाईगंज येथे आयोजित पहिला चंद्रभागा समिक्षण पुरस्कार वितरण, कलावंत सत्कार व शिवम् थिएटर्स नागभीड/वडसा च्या बुकिंग कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमात सत्कारमुर्तीच्या स्थानावरुन बोलतांना व्यक्त केले.

        देसाईगंज येथिल हटवार कार्यालया जवळील शिवम् थिएटर्स कार्यालयात दि. ३ रोजी समिक्षण पुरस्कार वितरण, कलावंत सत्कार व शिवम् थिएटर्स नागभीड/वडसा च्या बुकिंग कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नाट्यरसिक तथा पत्रकार महेंद्र कोवले होते. उद्घाटन एम. एम. गोंगले व डी. एम .गोंगले चंद्रपूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला सत्कारमुर्ती पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, सत्कारमुर्ती जेष्ठ नाट्य रंगकर्मी प्रा. सदानंद बोरकर, लेखक, दिग्दर्शक युवराज गोंगले, अनिल रंगारी, गुणवंत मारगाये, सुनील उईके, मनोज परशुरामकर उपस्थित होते.

         झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक नाट्य प्रयोग सादर होत असली तरी नाटकांचे समिक्षण होणे सुध्दा तेवढेच गरजे आहे व त्यासाठी समिक्षकांनी डोळसपणे नाटकाचे समिक्षण केले पाहिजे, असे मत प्रा.सदानंद बोरकर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

          यावेळी सत्कारमुर्तींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पहिला चंद्रभागा समीक्षण पुरस्कार समिक्षक नंदकिशोर मसराम यांना मिळाला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आला. रसिक मायबाप आणि कलाकार यांची नाती कायम जपल्या जावीत आणि शिवम् थिएटर्स चा हा शुभारंभ सोहळा येत्या काही वर्षात झाडीपट्टीतील रसिक आणि कलाकार यांचा स्नेहमीलन सोहळा व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

             कार्यक्रमाचे प्रास्तविक झाडीपट्टी रंगभूमीच्या पहिली महिला नाट्यनिर्माती सौ. ममता युवराज गोंगले (नागदेवे) यांनी केले तर आभार लेखक, दिग्दर्शक युवराज गोंगले व विजय वाटकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वप्निल लक्ष्मीराम यांनी केले. यावेळी अनेक नाट्यमंडळाचे अध्यक्ष, सचिव व कलावंत उपस्थित होते.