Home Crime बनावट सोने तारण कर्जातून ११ कोटींचा डल्ला,फरार व्यवस्थापकाला अखेर बेड्या…

बनावट सोने तारण कर्जातून ११ कोटींचा डल्ला,फरार व्यवस्थापकाला अखेर बेड्या…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : बनावट सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून तब्बल ११ कोटी ३ लाख रुपयांचा अपहार करून फरार झालेल्या अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापकाला अखेर आळंदी पोलिसांनी अटक केली. बाळू अर्जुन पवार (रा. चऱ्होली खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला पुण्यातील टिंगरेनगर परिसरातून बुधवारी (ता. ६) रात्री ताब्यात घेण्यात आले.

         अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी गुंतवणूकदार वारंवार पतसंस्थेच्या कार्यालयात धाव घेत होते. दरम्यान, संचालक मंडळाने बाळू पवार याच्याकडे व्यवस्थापक तथा सचिव म्हणून संपूर्ण कारभाराची जबाबदारी सोपवली होती.

          याच अधिकारांचा गैरवापर करत पवार याने पतसंस्थेचा ऑडिटर संजय लांडगे आणि सोनार पूर्णानंद खोल्लम यांच्यासोबत संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे खोटे कर्जदार उभे करून त्यांना सोनेतारण कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ही कर्जरक्कम आरोपींनी स्वतःकडे वळवून पतसंस्थेची तब्बल ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली.

         या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर संचालक मंडळाने आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ स्तरावर चौकशी झाल्यानंतर २३ जानेवारी रोजी बाळू पवार, संजय लांडगे आणि पूर्णानंद खोल्लम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील लांडगे आणि खोल्लम यांना न्यायालयातून जामीन मिळाला होता. मात्र, मुख्य आरोपी बाळू पवार फरार होता. अखेर आळंदी पोलिसांनी सापळा रचत त्याला पुण्यातून अटक केली.

          या कोट्यवधींच्या घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण असून, या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी चौकशीतून समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.