चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली : स्थानिक मनोहर भाई पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोली येथे ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून सोमवार, दिनांक 9 मार्च 2026 रोजी भव्य महिला सक्षमीकरण आणि कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम तसेच ‘इट अँड मीट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. चौधरी सर यांनी भूषविले. यावेळी कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून एडव्होकेट राणी शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून प्रोफेसर डाॅ. एम. बी. सोनकुसरे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. कांचन खापर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून महिला सेलच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक एडव्होकेट राणी शेंडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिला सक्षमीकरणावर भर देत संविधानातील महत्त्वाची कलमे, त्याचबरोबर ‘विशाखा मार्गदर्शक तत्वांची’ आणि ‘पोक्सो’ कायद्याची सविस्तर माहिती दिली. प्रमुख अतिथी प्रोफेसर डॉ. सोनकुसरे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि समाजात स्त्रियांचे असलेले स्थान यावर आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय प्राचार्य डॉ. डी. एस. चौधरी सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना निर्भय बनून शिक्षण घेण्याचा आणि आपली प्रगती करण्याचा संदेश दिला. महिला कक्ष आणि गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कांचन खापर्डे आणि प्रा. सरिता बैस यांनी ‘इट अँड मीट” या अभिनव खाद्य महोत्सवाचे आयोजन केले.
या महोत्सवात विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवून स्वतःचे खाद्यस्टाॅल्स लावले. यात पारंपारिक पदार्थ, दक्षिण भारतीय पदार्थ, गोड पदार्थ यांचा समावेश होता. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. माहीन शेख आणि कु. पायल गणवीर यांनी केले. तर आभारप्रदर्शन कु. निधी मोदी हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.



