चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी : येथील श्री गणेश दत्त गुरुमंदिरात दि. २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सद्गुरूदास महाराजांच्या दासनवमी निमित्त भावांजली कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सद्गुरूदास महाराजांच्या निजानंदगमनानंतर आयोजित या कार्यक्रमाला उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अजेय देशमुख, भंडारा जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी लीना फाडके, माजी प्राचार्य प्रा. अरुण कडबे तसेच समर्थ महाविद्यालय, लाखनीचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चारुदत्त आफळे यांनी सद्गुरूदास महाराजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू उलगडले. “सेवक आणि दास यात फरक असतो. सद्गुरूदास महाराज हे खऱ्या अर्थाने दास होते. त्यांनी सांगितलेल्या उपासनेत प्रचंड शक्ती आहे. पूर्वाश्रमीचे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी अध्यात्माच्या मार्गावर चालत धर्माचे पालन केले, म्हणूनच त्यांना ‘धर्मभास्कर’ ही उपाधी मिळाली. त्यांचे कार्य पुढेही अखंड सुरू राहील,” असे ते म्हणाले.
डॉ. दिगांबर कापसे यांनीही आपल्या मनोगतातून महाराजांच्या जीवनकार्याचा गौरव केला. त्यांनी इतिहासकार म्हणून तसेच अध्यात्मिक क्षेत्रात ‘धर्मभास्कर’ पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. माधुरी कानतोडे यांनीही महाराजांच्या शिकवणीतून आपले जीवन कसे घडले, याचा अनुभव कथन केला.
सद्गुरूदास महाराजांचे चिरंजीव अजय देशमुख यांनी आपल्या भाषणात महाराजांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. भांबेरी येथे ३० मार्च रोजी नवीन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून उपासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. लाखनी, भांबेरी, बासर व ब्रह्मपुरी येथील मंदिरांची व्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी विष्णुदास स्वामी आध्यात्मिक ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. अरुण कडबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्वातीताई मुंडले यांनी केले. कार्यक्रमाला उषा कडबे, दत्ता खेडीकर, वसंतराव कानतोडे, शीला भांडारकर, सविताताई फेंडरकर, सुषमा वंजारी, दिलीप खटके, पंकज पऱ्हाड, डॉ. अनिता दाणी, एकता पऱ्हाड, डॉ. प्रतिभा राजहंस, सुरेश कापगते यांच्यासह लाखनी, साकोली, भंडारा व नागपूर परिसरातील अनेक उपासक उपस्थित होते. धीरगंभीर वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.



