युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तहसिल कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत खल्लार व सामदा येथे (दि. 14)ला विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
शिबिरादरम्यान महसूल सेतू विभागामार्फत विविध प्रमाणपत्रे, संजय गांधी निराधार योजनेचे आदेशपत्र, शिधापत्रिका वाटप तसेच अद्यावत 7/13 व ८(अ)उतारे नागरिकांना देण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत मिळकत पत्रिका व नकाशांचेही वाटप करण्यात आले.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने बचत गटांना आदेशपत्रे देण्यात आली तसेच विविध विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन अनेक अर्ज स्वीकारण्यात आले व काही प्रकरणांचे तत्काळ निराकरण करण्यात आले.
या शिबिराला दोन्ही मंडळातील मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी व महिला उपस्थित होते. अनेक प्रश्न जागेवरच निकाली निघाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार डॉ. रविंद्र कानडजे नायब तहसिलदार प्रमोद काळे तसेच तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



