Home Social ज्ञानदान व अन्नदान करणारा खरा पुण्यवान : डॉ.नामदेव महाराज शास्त्री…

ज्ञानदान व अन्नदान करणारा खरा पुण्यवान : डॉ.नामदेव महाराज शास्त्री…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : समाजामध्ये ज्ञानदान व अन्नदान करणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने पुण्यवान ठरतो. माणूस जितके अधिक दान करतो, तितके त्याच्या जीवनात पुण्याचा संचय वाढत जातो आणि त्या पुण्याच्या बळावर त्याला आयुष्यात योग्य संधी प्राप्त होत असतात. ज्ञानाच्या माध्यमातून माणसाचे जीवन घडते, तर अन्नदानामुळे समाजातील गरजूंचे पोट भरते. त्यामुळे या दोन्ही दानांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे, असे प्रतिपादन न्यायाचार्य हभप डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी केले.आयेजित

       आळंदी येथे विमलकाकू कुऱ्हाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भागवताचार्य सिद्राम महाराज काळे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद्भागवत कथा सोहळ्यास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या प्रसंगी कुऱ्हाडे परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे व भैरवनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे यांनी न्यायाचार्य हभप डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे स्वागत केले.

       नामदेव महाराज शास्त्री म्हणाले की, श्रीमद्भागवत कथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून ती माणसाला सदाचार, भक्ती आणि सेवाभाव शिकवणारी जीवनशाळा आहे. संत परंपरेने समाजाला भक्ती, नैतिकता आणि परस्पर प्रेमाचा संदेश दिला आहे. या परंपरेतून प्रेरणा घेऊन समाजकार्यात योगदान देणे ही काळाची गरज आहे.

       स्व.विमलकाकू कुऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या श्रीमद्भागवत कथा सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांकडून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.