Home Social भविष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे :- नगरसेविका रुपाली धाडवे… —...

भविष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे :- नगरसेविका रुपाली धाडवे… — विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना नगरसेविका रुपाली धाडवे यांची दिलखुलास उत्तरे…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : प्रामाणिकपणे मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारल्यास जीवनात कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. चांगले शिक्षण घेऊन स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे. भविष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नगरसेविका रुपाली धाडवे यांनी केले.

          विश्वकर्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नगरसेविका रुपाली धाडवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देत विविध विषयांवर त्यांची मुलाखत घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय घडामोडींवर उत्सुकतेने प्रश्न विचारत दिलखुलास संवाद साधला. ‘दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्यानंतर प्रभागात कोणते उपक्रम राबवणार?’, ‘विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सुविधा आणि संधी निर्माण करणार?’ तसेच ‘आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना भविष्यात राजकारणात यायचे असेल तर काय करावे लागेल?’ असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. या प्रश्नांना धाडवे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

          विद्यार्थ्यांमध्ये समाज आणि देशाबद्दल असलेली जाणीव, नेतृत्वाची आवड आणि भविष्यासाठी असलेली स्वप्ने पाहून समाधान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि समाजातील घडामोडींविषयी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

         शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संवादातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.